; श्रीदत्त तत्व (त्रिपुरा रहस्य) या सत्संगाचे आयोजन
पुणे : आत्म म्हणजेच परमात्मा आहे, हे नेहमी आपल्याला सांगितले जाते. परंतु ते कसे जाणून घ्यायचे. तर त्यासाठी आधी सत्संग ऐकावे. त्यामुळे विवेकता निर्माण होईल. विवेकता निर्माण झाल्यानंतर तुमच्या विचारांची शक्ती वाढेल त्यावेळी गुरूच्या सानिध्यात जावे. गुरूंच्या सानिध्यात गेल्यावर परमात्मा तत्वाची ओळख होईल, असे मत श्री गुरूदेव व्यासजी यांनी व्यक्त केले.
कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्ट व श्री लकडी पूल विठ्ठल मंदिर यांच्या सहकार्याने दत्तमंदिर ट्रस्टच्या खजिनदार अॅड. रजनी उकरंडे यांनी श्रीदत्त तत्व (त्रिपुरा रहस्य) या सत्संगाचे आयोजन लकडी पूल विठ्ठल मंदिरात केले. श्री गुरूदेव व्यास यांनी गुरू महात्म्य, परमतत्वाची ओळख यावर मार्गदर्शन केले. सत्संग नंतर अध्यात्मिक प्रश्नोत्तरी आणि शक्तिपात ध्यानदीक्षा झाली. उपक्रमाला चंद्रहास शेट्टी यांनी विशेष सहकार्य केले.
गुरूदेव व्यास म्हणाले, गुरूची ओळख कशी करावी, हे जाणून घेणे आवश्यक आहे. ज्याच्याकडे परमात्मा तत्व आहे, तो गुरू आहे. जो भौतिक सुखातून मुक्त आहे, ज्याच्याकडे मुक्तीचे साधन आहे, तो साधूसंत. अशा संतांच्या चरणी शरण जावे. मी जे चांगले कर्म करतो, ते परमेश्वर माझ्याकडून करून घेतो हा भाव ज्यावेळी मनात येतो त्यावेळी मनुष्य कर्म सन्यासी होतो.
ते पुढे म्हणाले, तुम्ही चांगल्या गोष्टी वाचून, एकून, पाहून कर्म चांगले होणार नाहीत, तर ते सर्व आचरणात आणण्याची गरज आहे. हे ज्ञान तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही सतत त्याचे चिंतन कराल. अवधूत अवस्थेत जाण्यासाठी भौतिक सुखातून मुक्त होत चांगल्या विचारांचे चिंतन केले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.