मैत्रयुवा फाऊंडेशनतर्फे मकरसंक्रांतीनिमित्त आयोजन ; विशेष मुलांचा सहभाग
पुणे : तरुणाईसोबत दिग्गजांनी हलव्याचे दागिने आणि नवीन कपडे घालून बसलेल्या चिमुकल्यांवर बोरं, चॉकलेट, गोळ्यांचा वर्षाव करुन विशेष मुलांसोबत बोरन्हाण साजरे केले. सामाजिक जाणीवेचे भान राखत समाजातील विशेष मुलांना देखील सण-उत्सवांचा आनंद घेता यावा, याकरीता मकरसंक्रातीनिमित्त या आगळ्यावेगळ्या विशेष बोरन्हाणाचे आयोजन करण्यात आले होते.
मैत्रयुवा फाऊंडेशनतर्फे स.प.महाविद्यालय प्रांगणातील वि.रा.रुईया मूकबधिर विद्यालयात झालेल्या कार्यक्रमाला ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ.न.म.जोशी, फाऊंडेशनचे अध्यक्ष संकेत देशपांडे, विद्यालयाच्या प्राचार्य संगीता शिंदे आदी उपस्थित होते. हा उपक्रम दरवर्षी साजरा केला जातो. विद्यालयातील कर्णबधिर व मूकबधिर विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला.
डॉ.न.म.जोशी म्हणाले, देशाला सशक्त करण्यात तरुणाईचा वाटा खूप मोठा आहे. सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेऊन आजची तरुणाई काम करीत असल्याचे चित्र प्रेरणादायी आहे. समाजातील विशेष घटकाला आपल्यासोबत घेऊन असे कार्यक्रम सातत्याने होणे गरजेचे आहे. जोपर्यंत तरुणाई या देशात आहे, तोपर्यंत समाजात चांगल्या कार्याच्या प्रकाशवाटा उजळत राहतील, असेही त्यांनी सांगितले.