सैनिक मित्र परिवार व सहयोगी संस्थांतर्फे सिमेवरील जवानांना ४०० किलो तिळगुळ
पुणे : आपण किती मोठे आहोत, याला महत्व नाही. मात्र, आपला समाजाला किती उपयोग होतो, हे बघणे गरजेचे आहे. मधुरता म्हणजे मकरसंक्रांतीचा सण. मतभेद मिटवून एकत्र येण्याचा हा सण असून भारतीय सैनिक आणि देशवासियांमधील प्रेम वृद्धीसाठी असे कार्यक्रम महत्वाचे आहेत, असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा शाहू मोडक यांनी व्यक्त केले.
सैनिक मित्र परिवार आणि सहयोगी संस्थांतर्फे तसेच थोरले बाजीराव पेशवे रस्त्यावरील नूतन मराठी विद्यालय आणि नू.म.वि. प्रशालेच्या संयुक्त विद्यमाने शाळेच्या सभागृहात ४०० किलो तिळगुळ व भेटकार्ड पूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ निवेदक आनंद देशमुख, पृथ्वीराज धोका, लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटीचे हर्षद झोडगे, मेहुणपुरा मंडळाचे सचिन शिंदे, प्रशालेचे मुख्याध्यापक प्रकाश कांबळे, अनुजा कांगणे, आनंद सराफ आदी उपस्थित होते.
साम्राज्य ज्येष्ठ नागरिक संघ, कोथरूड सांस्कृतिक मंडळ, विविध गणेशोत्सव मंडळे, मंदिर ट्रस्ट यांनी उपक्रमाला सहकार्य केले. उपक्रमाला संयोजन सहाय्य शेखर कोरडे, शाळेचे पर्यवेक्षक लालबहादुर जगताप, दशरथ राजगुरू, कलाशिक्षक दत्तात्रय वेताळ यांनी केले.
आनंद देशमुख म्हणाले, समाजाने आपल्याला दिले, त्यामुळे कृतज्ञतेची भावना म्हणून आपणही समाजाला विविध माध्यमातून दिले पाहिजे.देशप्रेम मनात ठेवून आपल्या सर्वांचे रक्षण सिमेवरील जवान करीत आहेत. त्यामुळे त्यांच्याप्रती असलेले आपले कर्तव्य आपण पार पाडले पाहिजे.
आनंद सराफ म्हणाले, सैनिकांविषयी कृतज्ञता म्हणजे पुस्तकातील प्रतिज्ञा जगण्याचे वस्तुनिष्ठ धडे असतात. तिळगुळाचा उपक्रम १९९८ पासून अविरतपणे सुरु आहे. आपल्या देशाच्या सीमेला २३ हजार किमी असा परीघ लाभलेला आहे. त्यावर सज्ज असलेल्या जवानांसाठी आपण दरवर्षी तिळगुळ पाठवतो. प्रत्येक सैनिक हा राष्ट्रप्रेम मनात ठेवून जगत असतो. त्यामुळे आपण सण -उत्सव साजरे करताना त्यांची कायम आठवण ठेवायला हवी, असेही त्यांनी सांगितले. प्राजक्ता कारेकर यांनी सूत्रसंचालन केले.