पुणे:वडगावशेरी मतदारसंघातील नगर रोड क्षेत्रीय कार्यालयासाठी महानगरपालिकेकडून कचरा संकलनासाठी कचरा गाड्या देण्यात आल्या. आमदार बापूसाहेब पठारे यांच्या उपस्थितीत गाड्यांचा लोकार्पण सोहळा (ता. १०) पार पडला.
वडगावशेरी मतदारसंघात कचरा संकलनासाठी कचरा गाड्यांची जाणवणारी कमतरता लक्षात घेता, आमदार बापूसाहेब पठारे यांनी पालिका आयुक्त व संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. तसेच, सातत्याने पाठपुरावा करून कचरा संकलनासंदर्भातील अडीअडचणी निर्दशनास आणून दिल्या.
“बऱ्याच काळापासून अपुऱ्या कचरा गाड्यांमुळे कचरा संकलनाचा मोठा प्रश्न मतदारसंघात निर्माण झाला होता. गाड्या नसल्यामुळे कचरा संकलन होत नाही, परिणामी कचऱ्याचे ढीग पाहायला मिळतात. एकूणच कचरा व्यवस्थापनाच्या अभावामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येते आणि म्हणूनच या प्रश्नावर तातडीने उपाययोजना राबवणे गरजेचे होते. यावर महापालिकेने लक्ष घालून कचरा गाड्यांची व्यवस्था केल्याबद्दल आभारी आहे. या कचरा गाड्यामुळे नगर रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील कचरा संकलनाचा व व्यवस्थापनेचा प्रश्न सुटण्यास काही प्रमाणात मदत होईल”, असे यावेळी पठारे यांनी सांगितले.
लोकार्पणाच्या प्रसंगी, महापालिकेचे अधिकारी, पोलीस कर्मचारी तसेच स्थानिक नागरिक बांधव उपस्थित होते.