३८ व्या पश्चिम विभागीय युवा महोत्सवात घवघवीत यश
पुणे : भारती विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्च्या विद्यार्थ्यांनी ३८ व्या पश्चिम विभागीय युवा महोत्सवात पदकांची लयलूट केली आहे. विविध कला प्रकारात विद्यार्थ्यांनी ४ सुवर्ण, २ रौप्य पदक पटकावत महाविद्यालयाला महोत्सवाचे उपविजेते मिळवून दिले, अशी माहिती स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सचे संचालक शारंगधर साठे यांनी दिली.
गुजरात मेहसाणा मधील गणपत विद्यापीठ येथे आंतरविश्वविद्यालयीन युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय विद्यापीठ संघटने द्वारे आणि भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या सहकार्याने हा महोत्सव झाला. यामध्ये ४५ विद्यापीठातील १८७८ विद्यार्थ्यांनी २७ विविध प्रकारांमध्ये सहभाग घेतला.
डॉ. शारंगधर साठे, प्रा. डॉ. प्रवीण कासलीकर, डॉ.देविका बोरठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी विविध प्रकारांमध्ये यश संपादन केले.
अंजली गायकवाड (सुवर्ण, भारतीय सुगम संगीत), हर्षिद शंकर (सुवर्ण,भारतीय शास्त्रीय संगीत वाद्य), भारतीय लोक वाद्य वृंद गट (सुवर्ण), गौरी पेंडसे (सुवर्ण, भारतीय शास्त्रीय नृत्य), सूर्यकांत शिंदे (रौप्य, भारतीय शास्त्रीय संगीत तालवाद्य), नंदिनी गायकवाड (रौप्य,भारतीय शास्त्रीय संगीत गायन), भारतीय लोकनृत्य (चतुर्थ क्रमांक), नृत्य प्रकार चॅम्पियनशिप (प्रथम), संगीत प्रकार चॅम्पियनशिप (द्वितीय) अशा विविध कला प्रकारात बाजी मारत एकूण युवा महोत्सवात महाविद्यालयाने द्वितीय क्रमांक पटकाविला.
विद्यापीठाचे कुलपती प्रा. डॉ. शिवाजीराव कदम म्हणाले, आमच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश विद्यापीठासाठी गौरवाची बाब आहे. त्यांच्या कठोर परिश्रमांमुळे आणि प्राध्यापकांच्या मार्गदर्शनामुळे हे शक्य झाले.
सचिव व प्र-कुलगुरू डॉ. विश्वजीत कदम यांनी सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांची कला, मेहनत आणि आणि एकत्र येत केलेल्या परिश्रमामुळे हे यश मिळाले आहे. विद्यापीठाला राष्ट्रीय पातळीवर गौरव मिळवून देणारे हे यश आहे. कुलगुरू डॉ. विवेक सावजी यांनीही या यशाचे कौतुक केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. विद्यापीठाच्या सांस्कृतिक विभागाने या यशामुळे भारती विद्यापीठाला नवीन ओळख दिली असून, विद्यार्थ्यांच्या मेहनतीमुळे विद्यापीठाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकले आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.