स्वरचित काव्यस्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
रंगत-संगत प्रतिष्ठान आणि करम प्रतिष्ठानतर्फे आयोजन
पुणे : रंगत-संगत प्रतिष्ठान आणि करम प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या स्वरचित काव्यस्पर्धेत सुजित कदम यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. त्यांनी वृद्धांची व्यथा मांडणारी ‘मोबाईल’ ही कविता सादर केली. चैतन्य कुलकर्णी (संशयाचे भाले) यांना द्वितीय तर योगेश काळे (सागर संगम) यांना तृतीय क्रमांक मिळाला.
रंगत-संगत प्रतिष्ठान आणि करम प्रतिष्ठानतर्फे आज (दि. 11) मराठी स्वरचित काव्यस्पर्धा आयोजित करण्यात आली होती. पत्रकार भवन येथे आयोजित स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रभा सोनवणे आणि प्रज्ञा महाजन यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. स्पर्धेत 15 कवींचा सहभाग होता. रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर, करम प्रतिष्ठानचे अध्यक्ष भूषण कटककर, मैथिली आडकर मंचावर होते.
स्त्री शक्तीचे दर्शन घडविण्याबरोबरच प्रेम, ज्येष्ठांची मानसिक स्थिती तसेच मुक्तछंदातील कविता आणि जीवनात येणाऱ्या प्रसंगांवर थेट भाष्य करणाऱ्या कविता या वेळी सादर करण्यात आल्या.
स्पर्धेविषयी माहिती देऊन प्रास्ताविकात ॲड. प्रमोद आडकर म्हणाले, कविता म्हणजे स्वत:ने स्वत:शी केलेला संवाद असतो. स्पर्धा ही खरेतर स्वत:साठीच असते. स्पर्धा हे लोकांपर्यंत पोहोचण्याचे एक माध्यम आहे. भूषण कटककर यांनी गझल सादर केली.
परिक्षकांच्या वतीने बोलताना प्रज्ञा महाजन म्हणाल्या, भावनांना शब्द देते ती कविता. दुसऱ्याशी स्पर्धा म्हणजे हरणे-जिंकणे नव्हे तर स्पर्धेच्या माध्यमातून अनेक गोष्टी शिकायला मिळतात. पूर्ण समाधानी असणे हे प्रगतीत अडथळा ठरू शकते. त्यामुळे स्पर्धांमध्ये सहभागी होणे आवश्यक आहे.
निरुपमा महाजन, मुक्ता भुजबले यांनी संयोजन केले तर प्राजक्ता वेदपाठक, वैजयंती आपटे, वासंती वैद्य यांनी सूत्रसंचालन केले.