पुणे- प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेमध्ये केलेल्या कसुरीबाबत एफआरआय दाखल न करण्यासाठी तीन लाखांची लाच मागून अडीच लाख रुपये लाच घेताना फलोत्पादनचे उपसंचालकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.
संजय महादु गुंजाळ (उपसंचालक, फलोत्पादन ४ व प्रभारी सहसंचालक फलोत्पादन, कृषी आयुक्त कार्यालय, शिवाजीनगर) असे अटक केलेल्या अधिकार्याचे नाव आहे. या कारवाईनंतर त्यांच्या फोर्ट इको स्पोर्ट कारची तपासणी केली असता त्या कारमध्ये २ लाख १५ हजार रुपयांची रोकड मिळाली आहे.तक्रारदार हे २०१९ – २० मध्ये बुलढाणा जिल्ह्यात जळगाव जामोद येथे तालुका कृषी अधिकारी कार्यालयात कनिष्ठ लिपिक या पदावर कार्यरत असताना त्यांनी सुक्ष्म सिंचन (ठिबक) च्या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेमध्ये केलेल्या कसुरीच्या अनुषंगाने झालेल्या चौकशीअंती अमरावती विभागाचे कृषी सहसंचालक यांनी त्यांना १७ डिसेंबर २०२४ रोजी सेवेतून निलंबित केले आहे.
कृषी आयुक्तालय येथील उपसंचालक संजय गुंजाळ याने तक्रारदाराकडे त्यांच्या झालेल्या निलंबनाच्या कारवाईमध्ये मदत करण्यासाठी तसेच तक्रारदाराविरुद्ध ठेवलेल्या आक्षेपांच्या अनुषंगाने चौकशी करुन एफ आय आर दाखल न करण्यासाठी ३ लाख रुपयांची लाच मागितली होती.
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे याची तक्रार आल्यानंतर तिची पडताळणी करण्यात आली. त्यावेळी संजय गुंजाळ याने तडजोड करुन अडीच लाख रुपये लाच घेण्यास संमती दर्शविली. त्यानंतर शुक्रवारी संगमवाडी येथील खुराणा खासगी ट्रॅव्हलच्या कार्यालयासमोरील रोडवर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. तक्रारदाराकडून अडीच लाख रुपये घेताना संजय गुंजाळ याला पकडण्यात आले. येरवडा पोलीस ठाण्यात संजय गुंजाळ याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.