नागपूर -राजकारणात काहीही होऊ शकते. उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत गेले, अजित पवार महायुतीत आले. राजकारणात काहीही होऊ शकते, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार कधीही सोबत येऊ शकतात असे स्पष्ट संकेत दिले. नागपुरात झालेल्या जिव्हाळा पुरस्कार वितरण कार्यक्रमात झालेल्या मुलाखतीत फडणवीसांनी रोखठोक उत्तरे दिली. सुप्रसिद्ध प्रवचनकार व ज्येष्ठ संपादक विवेक घळसासी यांनी ही मुलाखत घेतली.
फडणवीस म्हणाले की, २०१९ नंतर २०२४ पर्यंत घडलेल्या घडामोडीतून मला “नेव्हर से नेव्हर’ ही एक गोष्ट लक्षात आली. म्हणजे कुठलीही गोष्ट होणार नाही असे समजून कधी चालायचे नाही. झाले पाहिजे असे नाही. असे व्हावे असे बिलकुल नाही किंवा ते होणेही फार चांगले आहे या मताचा मी नाही. शेवटी राजकारणात हे लक्षात ठेवले पाहिजे की, खूप ठामपणे असे होणारच नाही, असे आपण म्हणतो. त्या वेळी राजकीय परिस्थिती तुम्हाला कुठे नेऊन बसवेल याचा काही भरवसा नसतो. मर्यादाहीन पातळी सोडून वैयक्तिक टीका झाली तरी संयमी राहिलो.
शरद पवारांनी त्यांच्या पक्षाच्या बैठकीत रा. स्व. संघाच्या कामाचे कौतुक केले. याविषयी फडणवीस म्हणाले की, शरद पवार अतिशय चाणाक्ष आहेत. फेक नॅरेटिव्हचे वातावरण पंक्चर करणारी शक्ती कोण याचा त्यांनी निश्चितच अभ्यास केला असेल. ही शक्ती नियमित राजकारण करणारी नव्हे तर राष्ट्रकारण करणारी शक्ती आहे. हे त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी रा. स्व. संघाचे कौतुक केले असावे असे वाटते. शेवटी प्रतिस्पर्ध्याचेही कौतुक करावे लागते, असेही फडणवीस म्हणाले.

