mनागपूर-राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो. महाराष्ट्राच्या राजकारणात आम्ही कायम संस्कृती जपली असल्याचा दावा उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. राज ठाकरे माझे मित्र आहेत मात्र उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. त्यांच्या या विधानाला संजय राऊत यांनी उत्तर दिले आहे. राजकारणामध्ये काहीही असंभव नसते, असे देखील राऊत यांनी म्हटले आहे.
व्यक्तिगत शत्रुत्व ठेवून राजकारण करण्याची ही परंपरा दुर्दैवाने भाजपने सुरु केली. राजकीय विरोधकांवर खोटे गुन्हे, खोटे खटले दाखल करून त्यांना तुरुंगात टाकायचे, हे भाजपने केले आहे. अशी परंपरा या महाराष्ट्रात कधीच नव्हती, असा दावा देखील राऊत यांनी केला आहे. ही परंपरा सध्याचे मुख्यमंत्री संपवणार असतील तर राज्यातील राजकीय वातावरण चांगले राहावे यासाठी याचा फायदाच होईल, असे देखील राऊत यांनी म्हटले आहे.
भारतीय जनता पक्षाचे राजकारण हे व्यक्तिगत सुडाचे आणि व्यक्तिगत शत्रुत्वाचे आहे. मात्र महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब ठाकरे, शरद पवार अशा अनेक नेत्यांनी कधीच वैक्तिगत सुडाचे राजकारण केले नाही. या नेत्यांनी कधीच केंद्रीय तपास यंत्रणा किंवा पोलिसांचा गैरवापर करून राजकीय विरोधकांना तुरुंगवास भोगाव लावला नसल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. तर याची सुरुवात भारतीय जनता पक्षाने केली आहे. त्यामुळे देशाचे आणि राजकारणातील वातावरण बिघडले असल्याचे ते म्हणाले.
या संदर्भात संजय राऊत म्हणाले की, देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या राजकारणात नव्हते तेव्हापासून शिवसेना आणि भाजप मित्र होते. मात्र कोण कुठे जाणार आणि कुठे येणार, हे देवेंद्र फडणवीस निश्चित करणार नाहीत. तर प्रत्येकाच्या पक्षाची एक स्वतंत्र विचारधारा असते. आमचा पक्ष तुम्ही फोडला हे कोणत्या धोरणात बसते? असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला. राजकीय विरोधकांवर खोटे खटले दाखल करून त्यांना संपवण्याची परंपरा भाजपने सुरू केली आहे. मात्र ही परंपरा तोडण्याचा देवेंद्र फडणवीस प्रयत्न करत असतील तर त्याचे आम्ही स्वागतच करू. गडचिरोलीत त्यांनी चांगल्या कामाची सुरुवात केली, त्यांचेही आम्ही कौतुक केले असल्याचे ते म्हणाले. मात्र असे करत असताना भ्रष्टाचाऱ्यांना सोबत घेऊन ते सत्ता चालवतील, तोपर्यंत आमचा राजकीय संघर्ष सुरूच राहणार असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्रातील राजकीय वातावरण बिघडू नये, ही आमची पहिल्यापासून भूमिका राहिली आहे. सत्तेवर कोण येते यापेक्षा महाराष्ट्रातील वातावरण चांगले राहिले पाहिजे, असा विचार करणारे आज आम्हीच असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. आम्ही आणि भाजप आता मित्र राहिलेलो नाहीत. आम्ही भाजपचे सर्वात जुने आणि विश्वासार्ह मित्र होतो. मात्र, आता आमच्यात मित्रता राहिली नसल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.

