मुंबई-मुंबई ते नागपूपर्यंत सर्व महानगर पालिका, जिल्हा परिषद आणि नगर परिषदेच्या निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची घोषणा उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. उद्धव ठाकरे यांनी आम्हाला स्वळावर लढण्याचे सांगितले आहे. या संदर्भात आम्ही पदाधिकाऱ्यांशी तशी चर्चा केली असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे आम्हाला देखील पाहायचे आहे की काय होते? असे देखील ते म्हणाले. आघाडीमध्ये लढताना कार्यकर्त्यांना संधी मिळत नाही. त्याचा पक्षाच्या वाढीला देखील फटका बसतो. त्यामुळे महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगर परिषदेमध्ये आम्ही स्वबळावर लढणार असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे गट, काँग्रेस आणि शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र निवडणुका लढवल्या होत्या. यात लोकसभा निवडणुकीत आघाडीला मोठे यश मिळाले मात्र विधानसभा निवडणुकीत मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडी कायम राहणार का? याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. त्यातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता होणार आहे. या निवडणुका आघाडी एकत्र लढणार नसल्याचे संकेत उद्धव ठाकरे गटाच्या वतीने वारंवार दिले जात होते. त्यानुसार आज संजय राऊत यांनी स्पष्टपणे आपण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वभावावर लढणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडले असल्याचे बोलले जात आहेत.
आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संदर्भात उद्धव ठाकरे यांच्या वतीने त्यांच्या मातोश्री निवासस्थानी सर्वच स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या बैठकांचे सत्र सुरू होते. यामध्ये सर्वच महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि नगरपरिषदेच्या कामाचा आढावा उद्धव ठाकरे घेत होते. प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पक्षाची स्थिती आणि पक्ष मजबुत करण्यासाठी प्रयत्न उद्धव ठाकरे गटाच्या वतीने मागील काही दिवसांपासून सुरू होते. यातूनच उद्धव ठाकरे स्वबळाची तयारी करत असल्याचे संकेत मिळाले होते. त्यानुसार आता संजय राऊत यांनी स्वबळावर निवडणुकीला सामोरे जाणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
विधानसभा निवडणुकीत संजय राऊत यांनी जागा वाटपाला उशीर केल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला होता. त्याला प्रत्युत्तर देताना संजय राऊत यांनी काँग्रेसला चांगलेच सुनावले. महाराष्ट्रात काही नेते मुख्यमंत्रीपदाचा कोट शिवून तयार होते. त्यात आम्ही नव्हतो, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. या माध्यमातून संजय राऊत यांनी काँग्रेसला प्रत्युत्तर दिले आहे. महाराष्ट्रात शिवसेनेमुळे पराभव झाला असे म्हणत असतील तर हरियाणा, जम्मू-काश्मीर, पश्चिम बंगाल मध्ये काँग्रेसचा पराभव का झाला? असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला. विजय वडेट्टीवार देखील या सर्व बैठकांना हजर होते. आघाडीमध्ये समन्वयाचे आणि तडजोडाची भूमिका स्वीकारावी लागते. तशी भूमिका ज्याची नसते, त्यांना आघाडीमध्ये राहण्याचा अधिकार नसतो. असे देखील राऊत यांनी म्हटले आहे.