पुणे-“पुणे महानगरपालिका शिक्षण मंडळाचे पुन्हा अस्तित्व आणावे तसेच पुणे महानगर परिवहन महामंडळ लि.(PMPML) मध्ये सभासदांची पदे निर्माण व्हावी अशी मागणीपर अपेक्षा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी व्यक्त केली आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी सर्किट हाऊस,पुणे येथे पदाधिकारी व नागरिकांच्या भेटी घेतली. यावेळी शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना पुणे महानगरपालिका शिक्षण मंडळाचे पुन्हा अस्तित्व आणावे आणि पुणे महानगर परिवहन महामंडळ लि.(PMPML) मध्ये सभासदांची पदे निर्माण करावी असे निवेदन देत मागणी केली.
शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याने झालेल्या लोकसभा निवडणूक, विधानसभा निवडणुकीमध्ये जोमाने व प्रामाणिकपणे काम करीत महायुती सरकारला अधिक बळकट केलेलं आहे. पुणे महानगरपालिकेच्या स्थापनेपासून म्हणजे सन १९५० पासून अस्तित्वात आलेल्या पुणे शिक्षण मंडळाची मुदत दिनांक १४ मार्च २०१७ रोजी संपुष्टात आल्याने बरखास्त करण्यात आले. सुरवातीला महापालिकेत समाविष्ट असलेल्या शिक्षण मंडळाचा कारभार नंतर स्वतंत्र करण्यात आला होता. शिक्षण मंडळ अस्तित्वात असताना तसेच पुणे महानगर परिवहन महामंडळ लि.(PMPML) मध्ये पदाधिकारी व कार्यकर्ते यांना समितीवर अध्यक्ष, सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळत असे. त्यामुळे पदाधिकाऱ्यांना सामाजिक, राजकीय क्षेत्रात वाटचाल करण्यास फायदा होत असे. आता मात्र शिक्षण मंडळ अस्तित्वात नसल्याने त्यावर पक्षातील पदाधिकाऱ्यांना अध्यक्ष, सदस्य पदावर नेमणूक करता येत नाही. पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पुणे शिक्षण मंडळ, पुणे महानगर परिवहन महामंडळ लि.(PMPML) मध्ये सभासद म्हणून काम करण्याची संधी मिळाल्यास पक्षातील कार्यकर्त्याला न्याय मिळेल व पक्ष वाढीसाठी मदत होईल.