पुणे, दि. १० : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सी विभाग कार्यालयाकडून दारुबंदी कायद्यांतर्गत जप्त केलेल्या वाहनाच्या वाहन मालकांनी वाहनाच्या मूळ कागदपत्रांसह कार्यालयाशी प्रत्यक्ष संपर्क साधावा आणि वाहने ताब्यात घेण्याबाबत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन वाहने ताब्यात घ्यावीत, असे आवाहन निरीक्षक संदीप कदम यांनी केले आहे.
दारुबंदी कायद्यांतर्गत नोंदविलेल्या गुन्ह्यातील जप्त वाहनांच्या मूळ मालकांचा शोध घेण्यात येत असून याकरीता उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडून मूळ मालकांना वाहन ताब्यात घेण्याकरीता कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्याबाबत नोटीस बजावण्यात आली आहे. तथापि, ज्या वाहन मालकांना अशा प्रकारची नोटीस मिळाली नसेल त्यांनी कार्यालयाशी संपर्क साधावा. जप्त वाहनाच्या क्रमांकाची यादी कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात आली आहे, अशी माहिती श्री. कदम यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
0000