काँग्रेस पक्ष देशातील सर्वात मोठा पक्ष आहे. त्यांचे शंभर पेक्षा जास्त खासदार आहेत. त्यामुळे इंडिया आघाडीला एकत्र ठेवण्यासाठी काँग्रेसनेच पुढाकार घेतला पाहिजे, असा सल्ला देखील संजय राऊत यांनी दिला आहे. लोकसभा आणि राज्यसभेत काँग्रेस पक्षाचे विरोधी पक्ष नेते आहेत. त्यामुळे सर्वांना एकत्र ठेवण्याची जबाबदारी ही काँग्रेसची असल्याचे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे.
मुंबई- राष्ट्रीय पातळीवर ‘I.N.D.I.A.’ आघाडी तुटली तर ती पुन्हा जुडणार नाही, असे म्हणत उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसला पुढाकार घेण्याचा सल्ला दिला आहे. जागा वाटपात झालेला उशीर कोणामुळे झाला? यावरून विजय वडेट्टीवार यांना देखील माहिती असल्याचे म्हणत त्यांनी प्रत्युत्तर दिले आहे. तर आमच्या पक्षात सत्तेत सहभागी होण्यासाठी दुसऱ्या गटात जाण्याचा कोणीही सल्ला देत नाही, असा असे म्हणत राऊत यांनी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांना टोला लगावला आहे.
खासदार संजय राऊत आणि नाना पटोले यांच्यामुळे महाविकास आघाडीच्या जागा वाटपाला उशीर झाला असल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला होता. त्याला देखील राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. जागा वाटपाच्या चर्चेमध्ये विजय वडेट्टिवार देखील होते. त्यामुळे उशीर होण्याचे कारण त्यांना देखील माहिती असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. जागा वाटपाची चर्चा लांबवण्याची आवश्यकता नव्हती. मात्र, वडेट्टीवांरांनी विदर्भातील जागा राष्ट्रवादी आणि शिवसेनेला सोडल्या असत्या, तर जागा वाटपाची चर्चा लवकर संपली असती, असे देखील राऊत यांनी म्हटले आहे. विधानसभा निवडणुकीत ज्या जागा काँग्रेस लढले आणि हरले आहेत, त्या जागेवरुन राऊत यांनी विजय वडेट्टीवार यांच्यावर निशाणा साधला.
लोकसभा निवडणुकीतील वियजामुळे आता आम्हीच जिंकू असे काँग्रेसला वाटत होते. त्यामुळे जास्तीत जास्त जागा जिंकून कोणालातरी मुख्यमंत्री व्हायचे होते. देशातील वातावरण बदलले आहे, असेच काँग्रेसला वाटत होते, असे देखील राऊत यांनी म्हटले आहे. मात्र, आपण एकत्र लढलो पाहिजे असे आमचे मत होते. त्यामुळे जागा वाटपाला उशीर झाला याला सर्वच जबाबदार असल्याचेही राऊत यांनी म्हटले आहे. यासाठी राऊत यांनी कोल्हापूर उत्तर आणि चंद्रपूर येथील जागांचा उल्लेख केला. या जागा आम्ही लढतो असतो तर नक्कीच जिंकलो असतो, असा दावा देखील त्यांनी केला आहे.
विधानसभा निवडणूक नंतर देखील महाविकास आघाडीची अद्याप एकही बैठक झाली नाही. हे सत्य असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. लोकसभा निवडणुकीनंतर इंडिया आघाडीची बैठक झाली नाही, ती व्हायला हवी होती. तर विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये समन्वय राहिला नाही हे सत्य असल्याचे त्यांनी मान्य केले. मात्र, आघाडी तुटली तर त्याची किंमत सर्वांना भोगावी लागेल, अशा शब्दात राऊत यांनी आघाडीतील समन्वयाबाबत इशारा देखील दिला आहे.