बैठकीची वेळ अकरा वाजेची असताना काही नेते बैठकीला दोन वाजता येत
मुंबई-विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा पराभव झाला, यासाठी जागा वाटपात घालवलेला वेळ कारणीभूत असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. इतकेच नाही तर आघाडीच्या जागा वाटपात वेळ घालवणे हे षडयंत्र होते का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. नाना पटोले आणि संजय राऊत जागा वाटपात प्रमुख होते, असे म्हणत त्यांनी या दोन्ही नेत्यांवर विधानसभा निवडणुकीतील पराभवाचे खापर फोडण्याचा देखील प्रयत्न केला. या माध्यमातून आघाडीतील नेत्यांनाच घरचा आहेर वडेट्टीवार यांनी दिला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या वेळी महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा तिढा जर दोन दिवसात सुटला असता तर आम्हाला 18 दिवस प्रचारासाठी आणि प्लॅनिंग साठी उपयोगी पडले असते. त्यामुळे आम्हाला कोणतेही प्लॅनिंग करता आले नसल्याचे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. आम्हाला तीनही पक्षाला संयुक्त कार्यक्रम आखता आला नाही, अशी अनेक कारणे पराभवासाठी असल्याचे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. जागा वाटपाचा घोळ आणि घालवलेला वेळ, याचाही फटका आम्हाला विधानसभा निवडणुकीत नक्की बसला असल्याचे ते म्हणाले.
जागा वाटपाच्या चर्चेत संजय राऊत आणि नाना पटोले हे प्रमुख होते. बैठकीची वेळ अकरा वाजेची असताना काही नेते बैठकीला दोन वाजता येत होते. मी कोणाचेही नाव घेणार नाही मात्र, या सर्व कारणांमुळे बैठकीचा वेळ लांबत होता. एकाच जागेवर वारंवार चर्चा केली गेली. त्यामुळे ही कोणाची प्लॅनिंग होता का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. महाविकास आघाडीच्या जागेची चर्चा दोन दिवसात संपली असती तर आम्हाला अधिकचा वेळ मिळाला असता. वीस दिवस जागा वाटपात गेले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. हा वेळ घालवणे म्हणजे षडयंत्र किंवा प्लॅनिंग होते का? अशी शंका घेण्यास हरकत नसल्याचेही वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.