मुंबई-ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमधील मागील महिनाभरातील ही तिसरी भेट असल्याने चर्चांना उधाण आले आहे. मुंबईतील विविध समस्या आणि मतदारसंघातील प्रश्नासंदर्भात ही भेट घेतल्याची माहिती आहे. तर मुंबईत सध्या गाजत असलेला टोरेस घोटाळा याबाबतही आदित्य ठाकरे मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्याची माहिती आहे.
काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचे कौतुक करण्यात आले होते. गडचिरोलीतील विकासकामांचे निमित्त साधत त्यांचे कौतुक करण्यात आले होते. यानंतर संजय राऊतांनीही मीडियाशी बोलताना त्याचा पुनरुच्चार केला.
आदित्य ठाकरे म्हणाले की, मोकळ्या मनाने इथे आलो आणि मुंबईतील समस्यांबाबत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज भेट घेतली. यावेळी मविआ सरकारच्या काळातील जी सर्वांसाठी पाणी योजना होती ती पुन्हा सुरू करावी. मुंबईतील प्रत्येकाला पाणी मिळायला हवे. मागच्या मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली होती. ती स्थगिती उठवण्याबाबत फडणवीस सकारात्मक असल्याचे त्यांनी सांगितले.आदित्य ठाकरे म्हणाले की, पोलिस क्वार्टरमध्ये राहणाऱ्या सेवानिवृत्त पोलिस कुटुंबांना होणारा दंड स्थगित/कमी करण्यात यावा. मुंबईत निवृत्त पोलिस कर्मचाऱ्यांसाठी कायमस्वरूपी घरे देण्यात यावी. मविआने नवीन पोलिस घरांसाठी ₹600 कोटींची तरतूद केली होती. वरळी, माहीम, नायगाव, कुर्ला येथील नवीन पोलिस क्वार्टर्सची योजना आता 2 वर्षांपासून प्रलंबित आहे. त्यांचे पुनरुज्जीवन करणे आवश्यक आहे. यासह फ्री होल्ड जमिन करण्यासंदर्भात चर्चा केल्याचे त्यांनी सांगितले आहे.
आदित्य ठाकरे म्हणाले की, आताच्या घडीला फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहे. विरोधक म्हणून आम्ही काही प्रश्न त्यांच्याकडे मांडत असू, तर त्यात काहीच चुकीचे नाही. जनतेसाठी आम्ही एकत्रितपणे म्हणजे विरोधक आणि सत्ताधारी म्हणून काम करायला हवे.