पुणे-उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी विविध कामांचा आढावा घेतला. सायंकाळी चारच्या सुमारास त्यांनी माध्यमांशी संवाद साधत कामांची माहिती दिली. यादरम्यान, पत्रकारांनी अजित पवारांना प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांचे जानेवारी महिन्यातील पगार झाले नसल्याचे सांगितले. त्यानंतर अजित पवारांनी पत्रकार परिषद सुरू असतानाच अर्थ विभागाच्या सचिवांना फोन करून शिक्षकांच्या पगारासाठी झालेल्या दिरंगाईबाबत विचारणा केली.
अजित पवार म्हणाले, शासकीय कर्मचाऱ्यांचे पगार वेळेत झाले पाहिजे. त्याच्यात विलंब होण्याचे कोणतेही कारण असू नये. तरी देखील मी आता अधिकाऱ्यांना विचारतो. शिक्षकांचे पगार झाले नसतील, तर का झाले नाही? याबाबत विचारणा करतो आणि शिक्षकांचे पगार ताबडतोब कसे होतील, याबाबतची माहिती घेतो, असे सांगत असतानाचा त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना फोन फिरवला.
अजित पवार यांनी मंत्रालयातील सीपी ओ.पी. गुप्ता यांना फोन केला आणि शिक्षकांच्या चालू महिन्यातील पगाराबाबत विचारणा केली. आपण पगाराचे पैसे सगळ्या विभागांना उपलब्ध करून दिल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी अजित पवारांना सांगितले. प्रत्येक विभागात पगार देत असताना, काही त्रुटी किंवा संबंधित विभागाचा काही अंतर्गत प्रश्न निर्माण झाला असेल, असे एसीएस सांगितल्याचे उपमुख्यमंत्री पवार म्हणाले. त्यामुळे विभागाने सर्वांचे पैसे दिल्याचे स्पष्ट झाले आहे. शिक्षकांच्या पगाराबाबत सीपींशी बोलणे झाले आहे, आता शिक्षण सचिवांशी देखील मी बोलतो. यापुढे असा प्रकार होणार नाही, अशी खबरदारी घेतली जाईल, असेही अजित पवार म्हणाले.
अजित पवार यांनी या पत्रकार परिषदेत पुण्यातील विविध प्रश्नांवरही भाष्य केले. पुणेकरांचा वाहतुकीचा प्रश्न फार जटील बनला आहे. त्यामुळे आपल्याला यावर तोडगा काढण्याशिवाय गत्यंतर नाही. त्यामुळे मी यासंदर्भात सर्व अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. पुन्हा एकदा बैठक होणार असून यात मी लोकप्रतिनिधींना देखील सामील करून घेणार असल्याचे अजित पवार म्हणाले. पीसीएमसी कमिशनरने देखील माझा वेळ घेतला होता, त्यात पिंपरी येथे काही चांगली कामे करण्यात आली आहेत, त्यासंदर्भात देखील मी चर्चा केल्याचे ते म्हणाले. याच सोबत पुण्यात गुन्हेगारी वाढत असून नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार, अशी माहिती देखील अजित पवार यांनी दिली.