ऑनलाईन सभा नको हो बाबा ,म्हणाले आबा …
पुणे- दुकाने उघडली,व्यवहार सुरळीत झाले, विविध प्रश्नांवर रस्तोरस्ती आंदोलने होऊ लागलीत ,विविध राजकीय पक्षांचे विविध कार्यक्रमांना मंत्रीगण उपस्थिती लाऊ लागले आहेत मग आता तरी महापालिकेची मुख्य सभा छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात प्रत्यक्षात होऊ द्यात ऑनलाईन सभांच्या नावाने ठप्प झालेला, गोपनीय बनत चाललेला कारभार आता तरी प्रत्यक्षात मुख्य सभा घेऊन पारदर्शक पणे सुरळीत होऊ द्यात अशी मागणी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते ,नगरसेवक, आणि महापालिकेतील गटनेते आबा बागुल यांनी केली आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना पत्र पाठवून आज हि मागणी बागुल यांनी केली.
या संदर्भात बागुल म्हणाले,’ सन 2020 मधील कोव्हिड-19 कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने अनेक प्रतिबंधात्मक उपाययोजना सुचविल्या होत्या. त्यामध्ये महानगरपालिका व अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जनरल बॉडी मीटिंग्ज ऑनलाइन पद्धतीने घेण्याची सूचना केलेली होती. त्यानुसार पुणे महानगरपालिकेच्या दर महिन्याच्या सर्वसाधारण सभा ऑनलाइन पद्धतीने होत राहिल्या. मात्र, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी झालेला असल्यामुळे पुणे महानगरपालिकेची जनरल बॉडी मीटिंग प्रत्यक्ष स्वरूपात घेतली जावी यासाठी आम्ही आग्रही होतो. मा. उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे महानगरपालिका, जिल्हा परिषदा, तालुका पंचायत इत्यादींच्या सर्वसाधारण सभा ऑफलाइन पद्धतीने घेण्याचा मार्ग मोकळा झाला असून याविषयी राज्य शासनाच्या नगरविकास खात्याने पूर्वी निर्णय घेऊन जनरल बॉडी मीटिंग ऑनलाइन पद्धतीने घेण्याची पद्धत रद्द करून ती ऑफलाइन पद्धतीने घेण्याबाबत लेखी कळविले होते, तदनंतर जनरल बॉडी मीटिंग ऑफलाइन पद्धतीने चालू झाली होती. पुन्हा शासनाकडून जनरल बॉडी मीटिंग ऑनलाइन पद्धतीने घेण्याबाबत निर्णय करण्यात आला आहे.
पुणे शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे व लसीकरण देखील होत असल्याने पुणे महानगरपालिकेची जनरल बॉडी मीटिंग ऑनलाइन पद्धतीचा आग्रह धरणे हे गैरलागू आहे. ऑनलाइन पद्धतीत मार्गदर्शक सूचना व अन्य माहिती देणे इतपतच मर्यादित असणे योग्य असते. विषयाची विस्तृत चर्चा करणे हे ऑनलाइन पद्धतीत कधीच प्रभावीपणे होऊ शकत नाही, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.
तरी पुणे महानगरपालिकेची जनरल बॉडी मीटिंग ऑनलाइन पद्धतीने घेण्याची पद्धत रद्द करून ती ऑफलाइन पद्धतीनेच घ्यावी व त्यासंदर्भात त्वरित कार्यवाही व्हावी ही मागणी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने पुनश्च करतो असे आबा बागुल म्हणाले
याबाबत तातडीने निर्णय व्हावा, अशी विनंती आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरेआणि उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजितदादा पवार, यांचेकडे केली आहे. असेही बागुल यांनी सांगितले.

