नवीदिल्ली-फेब्रुवारी महिन्यात राजकारणात सक्रीय प्रवेश केलेले दाक्षिणात्य अभिनेते कमल हसन यांनी राजकीयदृष्ट्या एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे. आपण २०१९ च्या लोकसभा निवडणूकांसाठी काँग्रेससोबत हातमिळवणी करण्यास तयार आहोत असे त्यांनी सांगितले आहे. मात्र यासाठी त्यांनी एक अट घातली आहे. काँग्रेसने द्रमुकसोबतची युती तोडल्यास आपण असे करणार असल्याचे कमल हसन म्हणाले. एका खासगी वृत्तवाहिनीला मुलाखत देताना त्यांनी हे वक्तव्य केले. काँग्रेससोबत एकत्र आल्यास त्याचा तामिळनाडूतील जनतेला विकासाच्यादृष्टीने निश्चितच फायदा होईल असेही ते यावेळी म्हणाले.
कमल हसनच्या नवीन पक्षाचं नाव ‘मक्कल निधी मय्यम’ असं आहे. पक्षाच्या स्थापना सभेत त्यांनी आपल्या पक्षाच्या राजकीय चिन्हाचंही अनावरण केलं. आपला पक्ष जनतेसाठी काम करणार असून आगामी काळात आपल्यावर खूप मोठी जबाबदारी असणार आहे असं म्हणत हसन यांनी आपली राजकीय दिशा स्पष्ट केली होती. ‘मी आतापर्यंत प्रेक्षकांच्या मनात राहात होतो. पण, आता राजकारणाच्या माध्यमातून मला तामिळनाडूच्या जनतेच्या घराघरात पोहोचायचे आहे, जनतेत राहायचे आहे. राजकारणात सक्रिय असताना जनसेवेलाच माझे प्राधान्य असेल’, असे ते म्हणाले होते.
जूनमध्ये कमल हसन यांनी दिल्लीमध्ये जाऊन अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांच्यात तमिळनाडूतील राजकारणाबाबत चर्चा झाली होती. त्यावेळी आम्ही राजकारणाबाबत बोललो मात्र तुम्ही विचार करताय तसे काही झाले नाही असे त्यांनी पत्रकारांना सांगितले होते. त्यामुळे कमल हसन यांचे हे वक्तव्य फारसे आश्चर्यकारक नसल्याचे बोलले जात आहे. मात्र द्रमुकच्या विरोधात कमल हसन यांनी पहिल्यांदाच थेट विधान केले आहे. याआधी कमल हसन हे सर्वपक्षीय बैठकीला अनुपस्थित राहील्याने द्रमुककडून त्यांना सुनावण्यात आले होते. आपण भ्रष्टाचार कमी करण्यासाठी राजकारणात आल्याचेही कमल हसन त्यानी वेळोवेळी सांगितले होते. मात्र आताचे हे वक्तव्य तामिळनाडूतील राजकारणाच्यादृष्टीने निश्चितच महत्त्वाचे आहे.