पुणे दि.१६- जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पुणे जिल्ह्यातील ग्रामीण, पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका, नगरपालिका व कटक मंडळ या ठिकाणी आपले सरकार सेवा केंद्राच्या असलेल्या रिक्त जागा भरण्यासाठी ऑनलाईन सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
आपले सरकार सेवा केंद्राच्या असलेल्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या प्रक्रियेमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते. एकूण २ हजार ८०२ अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयास प्राप्त झाले आहेत. मुदतीत प्राप्त सर्व ऑनलाईन अर्जाच्या छाननीची प्रक्रिया पूर्ण होऊन पात्र अर्जासाठी ऑनलाईन पद्धतीने सोडत आयोजित केली आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रासाठी १८ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता, सर्व कॅन्टोनमेंट बोर्ड सर्व व नगरपालिकांसाठी त्याच दिवशी दुपारी ३ वाजता, पुणे महानगरपालिका १९ ऑक्टोबर सकाळी १० आणि ग्रामीण सर्व तालुक्यांसाठी २० ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता सोडत काढण्यात येईल. सर्व सोडत कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालय बी विंग येथील चौथ्या मजल्यावर होईल.
पात्र अर्जदारांची यादी https://aaplesarkarpune.com व https://pune.gov.in या संकेतस्थळाव अपलोड केली आहे. संबंधीत अर्जदार यांनी त्यांच्या क्षेत्रानुसार नमुद केलेल्या दिनांकास व वेळेवर ऑनलाईन सोडतीसाठी उपस्थित रहावे, असे आवाहन प्र. निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी केले आहे.

