मुंबई, दि. 14- भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्यासह मान्यवरांनी चैत्यभूमी येथे डॉ. आंबेडकरांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सामुदायिक त्रिशरण बुद्ध वंदना करण्यात आली.
कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री डॉ.विश्वजित कदम, माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर, मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबालसिंह चहल, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, पूज्य भदन्त डॉ.राहूल बोधी महाथेरो, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर चैत्यभूमी स्मारक समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे प्रामुख्याने उपस्थित होते.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वातंत्र्य, समता व बंधुता यांच्या माध्यमातून संपूर्ण समाजाला एकसूत्रात बांधण्याचे काम केले असे सांगून त्यांनी दिलेली शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा ही त्रिसूत्री आजही प्रासंगिक असल्याचे प्रतिपादन राज्यपाल कोश्यारी यांनी यावेळी बोलताना केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण समाजाला संविधानाच्या माध्यमातून समतेच्या सूत्रात गोवण्याचे काम केल्याचे राज्यपालांनी सांगितले.

