पुणे- महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका केलीय. तसेच पुणे महानगरपालिकेच्या कामाचं कौतुक केलंय. यावेळी त्यांनी सध्या नेते आणि नोकरशाहा जिल्ह्याजिल्ह्यामध्ये खंडणीचं काम करत आहेत, असा गंभीर आरोप केला. ते पुणे शहर भाजपाच्या नवीन इमारतीतील मध्यवर्ती कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आज नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात देश पुढे जातोय, तर दुसरीकडे महाराष्ट्रात वसुली हा एकमेव धंदा आहे. वसुलीशिवाय काहीच होत नाही. भ्रष्टाचार प्रचंड बोकाळला आहे. इथली नोकरशाही संपुष्टात येत आहे. महाराष्ट्राच्या नोकरशाहीला देशातील सर्वोत्तम नोकरशाही म्हटलं जायचं. त्या नोकरशाहीला राजकीय नेत्यांच्या भ्रष्टाचाराने पोखरून टाकलं. आता नेते आणि नोकरशाहा जिल्ह्याजिल्ह्यामध्ये खंडणीचं काम करत आहेत आणि सामान्य माणसाचा विचार करायला कुणी तयार नाही. इतक्या मोठ्या प्रमाणात वसुली सुरू आहे.”
मोदींच्या नेतृत्वाखाली वॅक्सिन तयार झाले नसते तर काय झाले असते? असा प्रश्न उपस्थित करत ते म्हणाले, मोदींनी सर्व वैज्ञानिकांना सोबत घेऊन, कंपन्यांना ऍडवान्समध्ये पैसे दिले. आणि वॅक्सिन तयार केली. दोन वर्षे पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्र सरकारने आम्ही इतके डोस दिले म्हणून सांगत होते, पण हे सर्व डोस त्यांना मोदींनी दिले असल्याचे स्पष्ट मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.”
पुण्यात शिवसेना नावालाही उरली नाही. भाजपने पुढच्या 25 वर्षाचा विचार करून त्यादृष्टीने विकासकामे केली आहेत. आमचे पुणेकरांना वचन आहे, जर पुन्हा सत्ता आली तर पुण्याला देशात प्रथम क्रमांकाच केल्याशिवाय राहणार नाही. असा असे वचन त्यांनी पुणेकरांना दिले आहे.यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ”महापालिकेवर भाजपचा भगवा अन् आरपीआयचा निळा फडकल्याशिवाय राहणार नाही” असा विश्वास भाषणातून व्यक्त केला .
फडणवीस म्हणाले, उदघाटनाला आलेल्या नागरिकांची ही गर्दी पाहून भाजप महानगरपालिकेवर भाजपचा भगवा आणि आरपीआयचा निळा फडकल्याशिवाय राहणार नाही. मला अलीकडे भाजपचा भगवा असं स्पष्टपणे सांगावे लागते. कारण आमचा भगवा असं सांगणारे आजकाल भगव्यासोबत प्रतारणा करत असल्याचा टोलाही त्यांनी यावेळी लगावला आहे.’कार्यालयाचे उद्घाटन असल्याने कार्यकर्ते स्वतः आले आहेत, जर आम्हाला शक्तीप्रदर्शन करायचे असेल तर पुण्यातील एकही मैदान पुरणार नाही. जे सावरकरांचा अपमान करतात. त्यांना महाराष्ट्र जागा दाखवल्याशिवाय राहणार आहे. आम्ही हिंदुत्ववादी आहोत, सावरकरवादी आहोत, बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेनुसार चालतो असेही त्यांनी यावेळी ठणकावून सांगितले आहे.”
पुणे महापालिका भाजपच्या ताब्यात आल्यावर कामे झाली
”जनतेच्या मनात, पुणेकरांच्या मनात केवळ भाजप आहे. कारण भाजपने केलेला विकास त्यांनी बघितला आहे. वर्षानुवर्षे राष्ट्रवादीच्या ताब्यात ही पालिका होती. पण पुणेकरांच्या हिताची कामे झाली नाही. कोरोनाच्या काळात नरेंद्र मोदींनी केलेल्या आवाहनानंतर भाजपचे कार्यकर्ते लोकांची सेवा करत होते. पुणे महानगरपालिकेने कोरोना काळात खूप मोठे कार्य केले असल्याचे ते यावेळी म्हणाले आहेत.”

