कराड (प्रतिनिधी) – महाराष्ट्रातील वृत्तपत्रांची निकोप वाढ व्हावी यासाठी महाराष्ट्र शासनाने जाहिरात धोरण निश्चित केले आहे. दरम्यान यामधील बहुतांश अटी व शर्ती लघु व मध्यम वृत्तपत्रांसाठी जाचक असल्याने यामध्ये सुधारणा करून शुद्धीपत्रक प्रसिद्ध करावे यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरू असल्याची माहिती असोसिएशन ऑफ स्मॉल अँड मिडीयम न्यूज पेपर्स ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अाप्पासाहेब पाटील यांनी दिली.
लघु व मध्यम वृत्तपत्रांचे प्रश्न, समस्या जाणून घेण्यासाठी कराडमधील विश्रामगृहामध्ये आयोजित केलेल्या बैठकीमध्ये त्यांनी ही माहिती दिली. यावेळी निवृत्त जिल्हा माहिती अधिकारी रंगराव शिंपुकडे, संघटन सचिव गोरख तावरे, खंडू इंगळे, अजित भिलारे, कृष्णत घाडगे, संतोष शिंदे, उध्दव बाबर, शामराव अहिवळे, रघुनाथ कुंभार, विश्चासराव पानवळ, शंकर शिंदे, प्रकाश पिसाळ, धनंजय सिंहासने उपस्थित होते.
नव्याने जाहीर झालेल्या शासकीय संदेश प्रसारण धोरण २०१८ मध्ये सुधारित नियमावली पुन्हा प्रसिद्ध करावी यासाठी हरकती, दुरुस्ती व सूचना असणारे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक ब्रिजेश सिंह यांना देण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्यात शासनामार्फत सर्व स्तरावरून देण्यात येणाऱ्या जाहिरातीच्या वितरणात सुसूत्रता यावी, त्यात स्वेच्छाधिकाराला कोणत्याही पातळीवर वाव राहु नये, वितरण पारदर्शक असावे. सर्व वर्गातील वृत्तपत्रांची निकोप वाढ होऊन त्या सर्वांना न्याय मिळेल अशा प्रकारचे जाहिरात धोरण असावे. यासाठी असोसिएशन ऑफ स्मॉल अँड मिडीयम न्यूज पेपर्स ऑफ इंडिया या संघटनेच्या माध्यमातुन प्रयत्न केला जात आहे असे ही प्रदेशाध्यक्ष अाप्पासाहेब पाटील यांनी सांगितले.
लघु व मध्यम वृत्तपत्रांबरोबरच जिल्हास्तरावरील दैनिक व साप्ताहिक शासनाच्या योजनांना ठळक प्रसिद्धी देत असतात. याचा विचार करून शासकीय संदेश प्रसारण धोरणाबाबत घेतलेल्या हरकती, दुरुस्ती व सूचनांचा सकारात्मक विचार शासनाने करावा अशी मागणी रंगराव शिंपुकडे यांनी केली. संघटितपणे संपादकांनी एकत्रितपणे राहुन वृत्तपत्र वाढीसाठी आणि आपल्या हक्काच्या जाहिराती मिळवण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन नवनियुक्त जिल्हाध्यक्ष खंडु इंगळे यांनी केले.
सर्व उपस्थित संपादकांनी शासकिय जाहिराती जादा प्रमाणात कशा मिळवाव्यात ? शासकिय धोरण काय आहे ? संघटना देशात व राज्यात कशा पद्धतीने काम करते ? अशा विविध प्रश्नाबरोबर वृत्तपत्र प्रसिद्ध करताना येणाऱ्या अडचणी मांडल्या. अप्पासाहेब पाटील यांनी सर्व संपादकांना सविस्तर माहिती दिली. प्रदेशाध्यक्ष आप्पासाहेब पाटील यांचे स्वागत खंडू इंगळे यांनी तर रंगराव शिंपुकडे यांचे स्वागत उद्धव बाबर, कृष्णात घाडगे यांनी केले. प्रास्ताविक व स्वागत गोरख तावरे यांनी केले. तर शेवटी आभार शंकर शिंदे यांनी मानले.