पुणे-चैत्र अमावस्येला दत्तमहाराजांकरिता विविध रंगीबेरंगी फुलांनी साकारलेली आकर्षक आभूषणे… सुवासिक फुलांनी सजलेला मुकुट… शोभिवंत फुलांची आरास… आणि मोगरा, गुलाब, झेंडू, चाफा, लिलीसारख्या नानाविध फुलांनी सजलेल्या दत्तमंदिरात वासंतिक पुष्पोत्सव मोठया उत्साहात साजरा झाला.
कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे संस्थापिका लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई यांच्या पुण्यतिथीनिमित्त पुष्पोत्सवाचे आयोजन करण्यात आले. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष अंकुश काकडे, कार्यकारी विश्वस्त अॅड. शिवराज कदम जहागिरदार, खजिनदार बी.एम.गायकवाड, उत्सवप्रमुख शिरीष मोहिते, उप उत्सवप्रमुख चंद्रशेखर हलवाई, विश्वस्त अॅड.एन.डी.पाटील, युवराज गाडवे, उल्हास कदम, नंदकुमार सुतार आदी उपस्थित होते.
पुष्पोत्सवाबाबत माहिती देताना उत्सवप्रमुख शिरीष मोहिते म्हणाले, 5 लाख मोगरा, 50 हजार लिली, 25 हजार गुलाब, 10 हजार झेंडू, 5 हजार चाफा आणि अशोकाच्या पानांनी पुष्पोत्सवात सजावट करण्यात आली. सुभाष सरपाले आणि सहका-यांनी ही आरास साकारली.
श्रीपाद श्रीवल्लभ, नृसिंह सरस्वती, श्रीमत् वासुदेवानंद टेंभेस्वामी महाराज आणि श्रीमाणिकप्रभू महाराज या दत्तमहाराजांच्या चार अवतारांच्या प्रतिमा देखील फुलांनी सजविण्यात आल्या होत्या. सकाळी ट्रस्टचे उपउत्सवप्रमुख चंद्रशेखर हलवाई आणि कुटुंबीयांच्या हस्ते लघुरुद्र करण्यात आला.