पुणे-प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीमधून बाहेर पडलेल्या लक्ष्मण मानेंनी वेगळी चूल मांडली आहे. त्यांनी आज आपल्या नव्या पक्षाची घोषणा केली. “महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडी” असे त्यांच्या नव्या पक्षाचे नाव आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मानेंनी नव्या पक्षाची स्थापना केल्याने वंचित बहुजन आघाडीची चांगीलीच गोची केली आहे. येत्या 29 जुलैला पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरात आघाडीचा पहिला निर्धार मेळावा पार पडणार असल्याचे त्यांनी सांगितले. माजी न्यायमूर्ती पीबी सावंत यांच्या हस्ते या मेळाव्याचे उद्घाटन होईल.
काँग्रेस, राष्ट्रवादी आणि डाव्या विचारांशी चर्चा करणार असल्याचे ते म्हणाले. विधानसभेला डाव्या आघाडी बरोबर जाण्याचा निर्णय घेतल्याचेही लक्ष्मण मानेंनी सांगितले. लोकसभा निवडणुकीतील चूक आता करायची नाही. भाजपचा पराभव करण्याऐवजी त्यांच्याच 12-12 जागा निवडून आल्या, त्यामुळे मला अपराधीपणा वाटत होता. जातीयवादी आणि धार्मिक संघटना बरोबर आम्ही जाणार नाही. भाजप युतीला हरविण्याचा आमचा प्रयत्न आहे. मातंग, धनगर, रिपब्लिकन ओबीसी संघटनांबरोबर आमची चर्चा सुरू असल्याचेही माने म्हणाले.
किरकोळ स्वार्थसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार विक्रीला काढणार नाही. बाबासाहेबांचे आम्ही सारेच वारसदार असल्याचे माने म्हणाले. मुस्लीम बांधवांना जय श्री राम म्हणून मारहाण केली जाते ही आराजकता आहे. उद्या तुमचीही घरे पेटल्याशिवाय राहणार नाहीत, उद्या ही वेळ तुमच्यावर येऊ शकते, असा इशारा मानेंनी दिला.
अब्दुल रहमान अंजरिया यांच्या अब्रूनुकसानीच्या दाव्यावर बोलताना, मानेंनी वकिलांशी बोलून नोटीसला उत्तर देणार असल्याचे म्हटले. माझे विधान राजकीय असून त्यांचा आणि माझा वैयक्तिक वाद नाही, ते काळे की गोरे हेही मला माहीत नाही. राजकीय आरोप होतात, मी वैयक्तिक टीका, चारित्र्यहनन केले नाही. त्यांच्या फोटोवरुन मी विधान केले आहे, वकिलांशी बोलून नोटीसला उत्तर देईल, असे माने म्हणाले.
प्रकाश आंबेडकरांच्या काँग्रेससोबत जाण्याच्या भूमिकेवरही मानेंनी टीका केली. ते म्हणाले, हा बाळासाहेबांचा डावपेचाचा भाग आहे. काँग्रेस कधीच मान्य करणार नाही, अशी मागणी करायची आणि बोलने तोडून टाकायचे, हा विचारसरणीचा नाहीतर डावपेचाचा भाग आहे. वंचित आघाडी भाजपाची बी टीम असल्याचे त्यांच्या वर्तनाने सिद्ध केले आहे. लोकसभेत आमची एकही जागा निवडून आली नाही, याउलट काँग्रेसलाही फायदा झाला नाही, फायदा हा भाजपचा झालाय. त्यामुळे लोक बी टीम म्हणाले तर राग यायचे कारण नाही. आकडे सांगतात की तुम्ही तिकडे मदत केली, असेही माने म्हणाले.