एमआयटी डब्ल्यूपीयूत पहिल्या अंतरराष्ट्रीय कायदा आणि शांतता परिषदेचे उद्घाटन
पुणे,दि.१४ डिसेंबर:“सृष्टीवर शांतता निर्मिती व समाज स्थिरतेसाठी काही नियम आणि कायद्यांची गरज आहे. आपले जीवन सुंदर, सुखमय व आनंदी करण्यासाठी भारतीय पौराणिक कथांमध्ये सुद्धा काही नियम व कायदे सांगितले आहेत. कायदे हे सुंदर नागरिकत्वाचे तत्व आहे.” असे विचार सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांनी व्यक्त केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे भारत तर्फे आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या ‘आंतरराष्ट्रीय कायदा आणि शांतता परिषदे’च्या ऑनलाइन उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. ‘जगात शांती संस्कृतीच्या प्रचार आणि प्रसारासाठी कायद्याची भूमिका’ हा या परिषदेचा मुख्य विषय होता.
यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती डॉ. अरिजीत पसायत, सर्वोच्च न्यायलयाचे वकील डॉ. ललित भसीन, पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती डॉ. भारतभूषण प्रसून, हायकोर्टाच्या अॅड. बासुरी स्वराज, राष्ट्रीय रक्षा युनिव्हर्सिटीचे कुलगुरू प्रा.डॉ. बिमल पटेल आणि अॅड.हेमंत बत्रा हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड हे होते.
तसेच, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड, कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस, लिबरल ऑर्ट विभागाच्या अधिष्ठाता प्रा.डॉ.अनुराधा पराशर आणि स्कूल ऑफ लॉ च्या प्रमुख डॉ. पोर्णिमा इनामदार हे उपस्थित होते.
न्या.दीपक मिश्रा म्हणाले,“समाजाच्या ऐक्यासाठी कायद्याच्या चौकटीत राहून जीवनमान व्यतीत करावे. समाजाच्या सर्वांगिण विकासातून शांतता प्रस्थापित करता येईल. आंतरराष्ट्रीय पातळीवर मानवी हक्क आणि शांती यासाठी कार्य होत आहे. कायदयाच्या माध्यमातून चांगला सुसंवाद साधल्यास शांतताप्रिय समाज निर्माण होण्यास मदत होईल. शाश्वत विकासातून मानवाचा उत्कर्ष होईल. विद्यापीठांनी पुढाकार घेऊन शांतीसाठी कार्य करावे.”
न्या. डॉ. अरिजित पसायत म्हणाले,“आंतरराष्ट्रीय विवाद, सीमा प्रश्नांसारख्या गोष्टींसाठी कडक कायद्यांच्या माध्यमातून विश्वात शांती निर्माण करु शकतो. मानव अधिकारांचा उपयोग करुन समाज कल्याणासाठी जे कार्य केले जाईल, त्यातूनच शांती निर्माण होईल. देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी कायदे गरजेचे आहेत. एमआयटी डब्ल्यूपीयूने अशा प्रकारची परिषद आयोजित करुन एक अद्वितीय कार्यक्रम सर्वांसमोर ठेवला आहे.”
अॅड. डॉ. ललित भसीन म्हणाले,“धर्म म्हणजे न्याय आहे. त्यात काय चुकीचे आणि काय बरोबर हे सांगितले आहे. धर्मानी सांगितलेल्या तत्वानुसारच या सृष्टीवर शांती निर्माण होऊ शकते. लोक हे धर्मातील कायदे स्वतःहून पाळतात. त्यामुळे सृष्टीवर अध्यात्माच्या आधारे शांती निर्माण होऊ शकते. पण जीवन जगतांना कायदयामध्ये राहुन त्याचे पालन करावे. आज पंचायत व जिल्हा परिषदेमध्ये वेगवेगळे कायदे आहेत. देशाची व्यवस्था सुरळीत करण्यासाठी कायदे खूप महत्वाचे आहेत. हेच कायदे कुटुंब, समाज आणि राष्ट्रासाठी अत्यंत महत्वाचे आहेत. सामाजिक एकतेसाठी न्याय महत्वाचा आहे.”
अॅड हेमंत बत्रा,“४.४ कोटी केसेस पेंडिंग आहेत. हे पाहता नवीन न्यायाधिशांची भरती करणे गरजेचे आहे. तसेच, व्हर्च्युअल कोर्टाचीही गरज आहे. भारतीय न्याय व्यवस्थेत तंत्रज्ञान व कृत्रिम बुध्दिमत्तेचा उपयोग करुन घ्यावा. वर्तमान काळात ऑनलाइनच्या माध्यमातून दर वर्षी ६ कोटी वाद मिटवले जातात.”
न्या.डॉ. भारतभूषण प्रसून म्हणाले,“आजच्या काळात कायदे, शांती आणि आंतरराष्ट्रीय शांती खूप गरजेचे आहे. नागरिकांसाठी सुख, शांती, आनंद, समानता यासाठी नियम आणि कायदे गरजेचे आहे. शांती ही आंतरिक व बाह्य स्वरूपाची असते. बाह्य स्वरुपाच्या शांतीसाठी म्हणजेच समाजिक शांतीसाठी कायदे गरजेचे आहेत. जागतिक स्तरावर ट्रेड लॉ, मानव कायदे, शांतीसाठी अशाप्रकारच्या कायद्यांची निर्मिती केली आहे. कुटुंब, समाज, राष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय प्रगतीसाठी शांती सर्वात महत्वाची आहे.”
प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,“संत ज्ञानेश्वर महाराज यांनी ७३० वर्षापूर्वी जीवन जगण्याचे काही मानवी नियम सांगितले आहेत. भारतीय तत्वज्ञान हे ‘एकम् सत् विप्रा बहुधा वदन्ती’ आणि ‘वसुधैव कुटुम्बकम’ची आहे. जगाला सुख, समाधान आणि शांतीचा मार्ग दाखविण्याचे दायित्व भारताकडे आहे. त्यानंतरच भारत हा विश्वगुरू बनेल.”
अॅड. बासुरी स्वराज म्हणाल्या,“चांगल्या समाज निर्मितीसाठी नियम आणि कायदे अतिशय गरजेचे आहेत. वेद, भगवद्गीता, महाभारत आणि रामायण या सारख्या ग्रंथामध्ये सुद्ध नियम आणि कायद्याचा उल्लेख दिसून येतो. त्याच्या आधारे देशातील सर्वोच्च न्यायालय हे समाजाचे संतुलन ठेवण्याचे कार्य करीत आहे. तसेच, आंतरराष्ट्रीय वाद मिटविण्यासाठी आंतरराष्ट्रीय कोर्टाची स्थापना केली गेली आहे.”
प्रा.डॉ. बिमल पटेल म्हणाले,“वेदिक गोष्टींचा उपयोग करुन आनंदी जीवन जगण्याचा प्रयत्न करावा. आधुनिक काळात सायबर कायदे बनविणे गरजेचे होते म्हणून त्यांची निर्मिती झाली. मानवाच्या शाश्वत विकासासाठी काही नियम व न्याय गरजेचे आहे. सरकारने आणि राजकीय पक्षांनी एकत्रित येऊन समाजामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी कार्य करणे गरजेचे आहे”
राहुल विश्वनाथ कराड म्हणाले,“कायदे हे लोकशाहीसाठी अतिशय महत्वाचे आहेत. यांच्या माध्यमातून समाजात मोठे बदल घडविता येतील. आता युवकांनी ब्रिटिशांची विचारधारा सोडून भारतीय विचारधारेचे पालन करावे. देशाला ७५ वर्ष पूर्ण झाल्यानंतर आता वसाहतवादी मानसिकता बदलावी. त्यासाठी स्वतंत्रता दिवस हा राष्ट्रीय दिवस म्हणून का साजरा करावा. न्यायक्षेत्रात कालानुरूप बदल करावा.”
कुलगुरू डॉ.आर.एम.चिटणीस यांनी प्रास्ताविक केले.
डॉ. अनुराधा पराशर यांनी स्वागतपर भाषण केले.
प्रा.डॉ गौतम बापट यांनी सूत्रसंचालन व डॉ. पोर्णिमा इनामदार यांनी आभार मानले.

