शहर, उपनगरांत वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनासाठी पुढाकार
पुणे : बुधवार पेठेतील कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी (१२५) गुरुपौर्णिमा उत्सवांतर्गत पुण्यातील गणेशोत्सव मंडळांना १२५ रोपांची भेट देण्यात आली. शहर व उपनगरातील गणेशोत्सव मंडळांनी आपापल्या परिसरात या वृक्षांचे रोपण व संवर्धन करुन हरित पुणे करिता हातभार लावावा, याउद््देशाने उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
मंदिरासमोरील श्री दत्त कला मंच उत्सवमंडपात झालेल्या कार्यक्रमाला सहाय्यक पोलीस आयुक्त रमाकांत माने, सतिश गोवेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे, सुनिल माने, राजेंद्र लांडगे, दत्तमंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अॅड.प्रताप परदेशी, कार्यकारी विश्वस्त अॅड.शिवराज कदम जहागिरदार, खजिनदार महेंद्र पिसाळ, उत्सव उपप्रमुख युवराज गाडवे, विश्वस्त राजू बलकवडे, अक्षय हलवाई आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दत्त महाराजांची आरती झाल्यानंतर गणेशोत्सव मंडळांच्या प्रतिनिधींना रोपे देण्यात आली.
साईनाथ मंडळ ट्रस्ट बुधवार पेठ, एकता मित्र मंडळ अरणेश्वर, संजीवनी मित्र मंडळ सहकारनगर, शिवराज मित्र मंडळ येरवडा, अखिल रामनगर मित्र मंडळ येरवडा, श्री शनिपार मंडळ, विधायक मित्र मंडळ, राष्ट्रीय साततोटी मंडळ कसबा पेठ, श्री शनी मारुती बाल गणेश मंडळ कोथरुड, श्री शिवाजी मित्र मंडळ भवानी पेठ, श्रीकृष्ण मंडळ कॅम्प. अखिल कापडगंज मित्र मंडळ रविवार पेठ, वीर शिवराज मित्र मंडळ गुरुवार पेठ, युगंधर मित्र मंडळ राष्ट्रीय हरित क्रांती पर्वती आदी मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
रमाकांत माने म्हणाले, शहर व उपनगरांमध्ये मोठया प्रमाणात कॉंक्रिटीकरण होत आहे. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या दृष्टीने सर्वदूर वृक्षारोपण करणे गरजेचे आहे. काही ठिकाणी अजूनही वनराई शिल्लक आहे. मात्र, वृक्षारोपणासोबतच वृक्षसंवर्धन ही देखील आपली जबाबदारी असून गणेशोत्सव मंडळे ही जबाबदारी उत्तमपणे पार पाडतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
अॅड.प्रताप परदेशी म्हणाले, गणेशोत्सव मंडळांचे कार्य केवळ उत्सवापुरते मर्यादित राहिलेले नसून वर्षभर अनेक गणेशोत्सव मंडळे विधायक कार्य करीत आहेत. त्यांच्या विधायकतेला जोड देण्याकरीता ट्रस्टतर्फे १२५ रोपांची भेट आम्ही देत आहोत. याद्वारे निसर्गाचा समतोल राखण्याचा प्रयत्न मंडळे व कार्यकर्ते करतील, असेही त्यांनी सांगितले. अॅड.शिवराज कदम जहागिरदार यांनी सूत्रसंचालन केले. राजू बलकवडे यांनी आभार मानले. नुकतेच दत्तमंदिर ट्रस्ट व डॉ.डी.वाय.पाटील हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर ब्लड बँक, पिंपरी यांच्या तर्फे रक्तदान शिबीर घेण्यात आले. त्याचे उद््घाटन रक्ताचे नाते ट्रस्टचे राम बांगड व डॉ.जयश्री तोडकर यांच्या हस्ते झाले.
लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्तमंदिरातर्फे गणेशोत्सव मंडळांना १२५ रोपांची भेट
Date:

