स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांची माहिती
पुणे- सदाशिव पेठ-शनिवार पेठ प्रभाग आदर्श करण्याची प्रशासकीय जबाबदारी अतिरिक्त कुणाल खेमणार यांनी स्वीकारली असून याच धर्तीवर शहर आदर्श करण्यासाठी महापालिकेचे तीन अतिरिक्त आयुक्त, पंचवीस विभाग प्रमुख आणि पाच क्षेत्रिय अधिकार्यांवर अशाप्रकारची एकएका प्रभावाची जबाबदारी टाकण्यात येणार असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिली.
मध्यवर्ती पेठांचा भाग असलेल्या सदाशिव पेठ-शनिवार पेठ प्रभागातील विकासकामांची आज पाहाणी करण्यात आली. यावेळी रासने यांच्यासह अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमणार, नगरसेविका अड. गायत्री खडके, पाणीपुरवठा विभाग प्रमुख अनिरुद्ध पावसकर, पथ विभाग प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी, मैलापाणी विभाग प्रमुख संतोष तांदळे, उपायुक्त अविनाश सपकाळ, आशीष महाडळकर, उमेश गोडगे, काशिनाथ गांगुर्डे, उदय लेले, किरण जगदाळे, परेश मेहेंदळे, अमित गोखले, मनिष जाधव, दिलीप पवार, अनिल बेलकर, विनायक घाटे, निलेश कदम, अमित कंक, सौरभ रायकर, बिरजू ननावरे उपस्थित होते.
रासने म्हणाले, हा प्रभाग आदर्श करण्यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून मी व्यक्तिश: लक्ष घालून पाठपुरावा करीत आहे. आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्तांनी तीन वेळा भेटी देऊन विकासकामांचा आढावा घेतला आहे. या दर्जाच्या अधिकार्यांच्या आदेशानंतर विकासकामांना गती मिळाली असली तरी अनेक छोटी-मोठी विकासकामे प्रलंबित आहेत. त्यामुळे प्रशासनाच्या हेतूवर नागरिक प्रश्न उपस्थित करतात. यावर उपाययोजना म्हणून प्रशासकीय अधिकार्यांवर प्रभाग आदर्श करण्याची जबाबदारी निश्चित करण्याचा निर्णय घेण्यात आला., लक्ष्मी रस्ता आणि केळकर रस्त्यावरील पथ विभागाची कामे पूर्ण झाली आहेत. बाजीराव रस्ता, शिवाजी रस्ता आणि टिळक रस्त्यावरील पाणीपुरवठा, ड्रेनेज, स्मार्ट सिटी विभागाची कामे आठवड्याभरात पूर्ण होतील. त्यानंतर दहा दिवसात पथ विभागाची डांबरीकरणाची कामे पूर्ण होणे अपेक्षित आहे. अंदाजपत्रकात महत्त्वाच्या २५ रस्ते सुशोभीकरणासाठी निधीची विशेष तरतूद करण्यात आली आहे. मध्यवर्ती पेठांतील सर्व रस्त्यांचा त्यात समावेश असून, सुशोभिकरण, सुरक्षिततेच्या सर्व उपाययोजना करण्यात येणार आहेत.
रासने पुढे म्हणाले, रस्त्यांवरील ड्रेनेज चेंबर समपातळीत आणणे, पदपथांची दुरूस्ती व पादचार्यांना अडथळा एमएसईबीचे डीपी आणि अनधिकृत बांधकामे हटविणे, ठिकठिकाणी साठलेला राडारोडा साफ करणे, काम पूर्ण झाल्यानंतर रस्त्यावरच ठेवलेले पाईप उचलणे, पेव्हर ब्लॉकची दुरुस्ती करणे, स्वच्छतेच्या उपायययोजना करणे, पुरेशी प्रकाश व्यवस्था करणे, सीसीटीव्ही यंत्रणा बसविणे, अनधिकृत पोस्टर, बॅनर लावणार्यांवर कारवाई करणे अशाप्रकारच्या सुचना करण्यात आल्या. ही छोटी-मोठी कामे पंधरा दिवसांत पूर्ण करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले.
ऐतिहासिक शनिवारवाड्याच्या भोवताली ठिकठिकाणी राडारोडा पसरला आहे. परिसरात स्वच्छतेचा अभाव आहे. प्रकाश व्यवस्था पुरेशी नाही. सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही यंत्रणा बसविणे गरजेचे आहे,या वास्तूचे पावित्र्य राखणे आवश्यक आहे. त्यासाठी दोन दिवसांत रंगरंगोटीसह सर्व कामे प्राधान्याने करण्याचे आदेश रासने यांनी दिले.
वृत्तपत्र विक्रेत्याचे शिल्प
शंभर वर्षांपासून आप्पा बळवंत चौक हे वृत्तपत्र वितरणाचे मुख्य ठिकाण आहे. या ठिकाणी वर्तमानपत्रांचे संकलन करून विक्रेते शहराच्या विविध भागांमध्ये त्याचे वितरण करतात. या चौकाचे ऐतिहासिक महत्त्व जतन करणे आणि वृत्तपत्र विक्रेत्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वृत्तपत्र विक्रेत्याचे शिल्प उभारण्यात येणार असल्याचे रासने यांनी सांगितले.

