क्रांतीचा धगधगता अंगार… तरूणांची प्रेरणा म्हणजे क्रांतीसिंह नाना पाटील… – संतोष शिंदे
पुणे- क्रांतीसिंह नाना पाटील जयंती सिंचन भवन, येथे नुकतीच साजरी करण्यात आली. यावेळी संभाजी ब्रिगेड पुणे जिल्हा कार्याध्यक्ष संतोष शिंदे, उपविभागीय अभियंता इंजी. विजय काळे, अर्जुन देशमुख, श्री. जानराव साहेब, इंजी. अनिल कोळी उपस्थित होते.
संतोष शिंदे यावेळी म्हणाले,क्रांतीसिंह नाना पाटील यांचा जिवनपट प्राथमिक शिक्षण विभागाने पाठ्यपुस्तकरूपात आभ्यासक्रमात शिकवला गेला पाहिजे. कारण क्रांतीसिंह नाना पाटील यांनी प्रतीसरकारच्या माध्यमातून जसे ब्रिटीशांविरुद्ध सशस्त्र आंदोलन उभे केले होते तसेच समाजात एक चांगली शासनव्यवस्था निर्माण केली होती. भांडणतंटे सोडवण्यासाठी लोकन्यायालयाची स्थापना करण्याचे महत्वाचे कार्य नानांनी केले होते. व्यसनमुक्तीसाठीही नानांनी प्रतीसरकारच्या माध्यमातून विशेष प्रयत्न केले. बहुजन समाजात शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी कर्मवीर भाऊराव पाटलांच्या खांद्याला खांदा लावून नाना उभे होते. गावोगावी ग्रंथालये उभी करून समाजपरिवर्तनात मोलाची कामगिरी बजावली. नानांवर महात्मा फुल्यांचा व सत्यशोधक समाजाच्या विचारांचा विशेष प्रभाव होता. भटशाही व सावकारशाही गरीब शेतकऱ्यांना नडत आहेत म्हणून नानांनी या प्रवृत्तीं विरुद्ध आवाज उठवला. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामीही नानांचे योगदान खूप आहे.
सातारा-सांगली भागात सुमारे १५०० गावात नानांचे प्रतिसरकार कार्यरत होते. सामान्य बहुजन समाज व शेतकऱ्यांवर होणाऱ्या प्रत्येक अन्यायाला प्रतिसरकारच्या माध्यमातून वाचा फोडली जाई. त्यामुळे सामान्य जनतेला प्रतिसरकार आणि क्रांतिसिंह नाना पाटील यांच्याबद्दल फार आत्मीयता होती. म्हणून क्रांतीसिंह नाना पाटीलांचे कार्य सर्व समाजाला कळण्यासाठी व तरूणांना अजून प्रेरणामिळण्यासाठी क्रांतीसिंह नाना पाटील यांचा जिवनपट प्राथमिक शिक्षण विभागाने पाठ्यपुस्तकरूपात आभ्यासक्रमात शिकवला गेला पाहिजे. त्यासाठी संभाजीब्रिगेड पाठपुरावा करेल. असे मत संभाजी ब्रिगेड पुणे जिल्हा कार्याध्यक्ष संतोष शिंदे यांनी व्यक्त केले.