पुणे-१३ ऑक्टोबर रोजी संगीत क्षेत्रातील बेताज बादशहा किशोर कुमार यांची ३० वी पुण्यतिथी होती. या ३० व्या पुण्यतिथीचा योग साधत मध्य प्रदेश सरकारच्या वतीने एका अभिनव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी पुण्यातील सुप्रसिद्ध गायक जितेंद्र भूरूक आणि नगर येथील प्रसिद्ध शिल्पकार प्रमोद कांबळे यांना किशोर कुमार यांच्या जन्मगावी म्हणजेच खांडवा येथे आमंत्रित करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे एकाच स्टेजवर किशोर कुमार यांचा पुतळा बनवणे आणि त्यांच्या गाण्यांचा कार्यक्रम असे दोन्ही उपक्रम एकाच वेळी आयोजित करण्यात आले होते. भारतात प्रथमच अशा प्रकारच्या अभिनव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी किशोर कुमार यांचा पुतळा बनवून पूर्ण होईपर्यंत म्हणजेच सलग साडेपाच तास जितेंद्र भूरूक यांनी किशोर कुमार यांची विविध गाणी सादर केली. या कार्यक्रमात जितेंद्र भूरूक यांनी वेगवेगळ्या मूड्स मधली एकूण ६३ गाणी कोमल कनाकिया, गणेश मोरे, गफार मोमीन या साथीदारांच्या मदतीने गायली. तसेच या सादरीकरणात त्यांना पुण्यातील १२ वादकांच्या वाद्यवृंदाने साथ केली. कार्यक्रमाचे निवेदन पराग चौधरी यांनी केले.
या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे अजून एक महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे किशोर कुमार यांनी गायलेल्या गाण्यांचे ‘व्हिज्युअल्स’ पडद्यावर दाखवले जात असताना जितेंद्र भूरूक यांनी त्या गाण्यांशी ‘सिंक्रोनाइझ’ करून गाणी सादर केली. सर्व खांडवाकरांसाठी हा खूपच भन्नाट अनुभव होता. किशोर कुमारांच्या चाहत्यांनी गाण्यांवर उत्स्फूर्त नृत्य करत उत्तम प्रतिसाद या कार्यक्रमाला दिला.
नगर येथील प्रसिद्ध शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी किशोर कुमार यांचा पुतळा साकारला असून येत्या दोन ते तीन महिन्यात पुतळा पूर्ण होऊन त्याची स्थापना किशोर कुमार यांच्या हवेलीजवळील चौकात करण्यात येईल तसेच त्या चौकाचे नामकरण देखील करण्यात येईल.