श्रीरामजी संस्थान तुळशीबागतर्फे जया एकादशीनिमित्त कीर्तन
पुणे : व्यवहारामध्ये आपण अनुभवाने जरी शिकत असतो, तरी देखील गुरुचे महत्व फार वेगळे आहे. गुरु हा कोणत्याही व्यवहारातील बारकावा शिकवतो. कोणतीही कला असो, ती शिकण्याकरीता गुरु महत्वाचा आहे. गुरुचे महत्व अनन्यसाधारण आहे. अगदी एखादे लहान मुल देखील गुरु होऊ शकतो. त्यात पोटाची विद्या शिकविणारा गुरु हा सर्वात मोठा आहे, असे मत कीर्तनभूषण ह.भ.प. ज्ञानेश्वरबुवा कपलाने यांनी व्यक्त केले.
श्रीरामजी संस्थान तुळशीबाग च्यावतीने तुळशीबाग राम मंदिरात जया एकादशीनिमित्त कीर्तनाचे आयोजन करण्यात आले. यावेळी संस्थानचे कार्यकारी विश्वस्त रामदास तुळशीबागवाले, भरत तुळशीबागवाले, राघवेंद्र तुळशीबागवाले, श्रीपाद तुळशीबागवाले, शिशिर तुळशीबागवाले, कोटेश्वर तुळशीबागवाले यांसह तुळशीबागवाले परिवार उपस्थित होता.
ह.भ.प.ज्ञानेश्वरबुवा कपलाने म्हणाले, कीर्तनाचे महत्व अनन्यसाधारण आहे. कीर्तनामुळे पृथ्वीवर वैकुंठ व अयोध्या उभी राहिली. सद््गुरुंच्या बद्दल सांगणारे अभंग भरपूर आहेत. गुरु कोणाला म्हणायचे? याचे एकनाथी भागवतात ओव्यांतून चांगले वर्णन केले आहे. गुरु वेदाध्ययन, ज्योतिषशास्त्र शिकवितात, व्याख्यानातून तत्वज्ञान सांगतात, परंतु ते सद््गुरु नाहीत. ज्ञान देतात, पोटाची विद्या शिकवितात, त्यांना गुरु म्हणले जाते.
ते पुढे म्हणाले, गुरुमध्ये वेगळ्या पद्धतीने ज्ञान देणारे अनेकजण आहेत. त्याचा फायदा शिष्यांना घेता आला पाहिजे. ज्ञानाचा व्यवहारीक फायदा शिष्यांना व्हावा, अशी विद्या गुरु देतात. आत्मज्ञान देऊन शिष्याला मोक्षापर्यंत नेणारा सद््गुरु असतो, असेही त्यांनी सांगितले.
पोटाची विद्या शिकविणारा गुरु सर्वात मोठा
Date:

