पुणे : प्रसिद्ध संगीतकार मोहम्मद जहुर खय्याम हाशमी अर्थात खय्याम यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी आयोजित ‘खयाल-ए-खय्याम’ स्वरमैफल येत्या शनिवारी (ता. ६ मार्च) सायंकाळी ५.३० वाजता कोथरुड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात रंगणार आहे. मनिषा निश्चल्स महक आयोजित ‘खयाल-ए-खय्याम’ स्वरमैफलीतून खय्याम यांनी संगीतबद्ध केलेल्या गीतांचा नजराणा रसिकांना अनुभवता येणार आहे.
खय्याम भारतीय चित्रपटसृष्टीला लाभलेले एक महान संगीतकार आहेत. त्यांनी संगीतबद्ध केलेली ‘कभी कभी मेरे दिल मैं’, ‘आजा रे…आजारे ओ मेरे दिलभर’, ‘मैं पल दो पल का शायर’, ‘दिल चीज क्या है आप मेरी’ अशी कितीतरी सदाबहार आणि अजरामर गाणी आजही रसिकांच्या ओठांवर असतात. त्यांनी संगीत दिलेले कभी कभी, नूरी, त्रिशूल, बाजार, उमराव जान, रझिया सुलतान व अन्य चित्रपट सुपरडुपर हिट ठरले. त्याच चित्रपटांतील गीतांची मेजवानी ‘खयाल-ए-खय्याम’मधून मिळणार आहे.
या मैफलीमध्ये गायक गफार मोमिन, अजय राव, प्रसाद कारूळकर, मनिषा निश्चल यांचे गायन ऐकण्याची पर्वणी पुणेकरांना मिळणार आहे. मैफलीचे निवेदन निरंजन ठाकूर करणार आहेत. ध्वनीव्यवस्था आयान मोमिन, तर प्रकाशव्यवस्था विजय चेन्नुर करणार आहेत. सोनी मराठी वाहिनीवरील ‘सिंगिंग स्टार’ या रियालिटी शोमधील वाद्यवृंद साथसंगत करणार आहे. त्यामध्ये अमेय ठाकूरदेसाई (तबला), प्रणव हरिदास (बासरी), सिद्धार्थ कदम (रिदम मशीन, पॕड), झंकार कानडे (कि-बोर्ड), अक्षय कावळे (कि-बोर्ड), हनुमंत रावडे (ढोलक) यांचा समावेश आहे.
लॉकडाऊननंतर संगीत क्षेत्राची घडी आता हळूहळू पूर्वपदावर येत आहे. गायक, संगीतकार व सांगीतिक कार्यक्रमातील अन्य कलाकारांना नवसंजीवनी देण्यासाठी आयोजक पुढे सरसावले आहेत. नाउमेद न होता पुन्हा त्याच उत्साहाने आपली कला सादर करण्याची प्रेरणा ‘खयाल-ए-खय्याम’ कार्यक्रमातून मिळेल, असे संयोजक मनीषा निश्चल यांनी नमूद केले.

