मनपा शाळांच्या गुणवत्ता वाढीसाठी निधी कमी पडु देणार नाही – योगेश गोगावले
पुणे- मनपाच्या सर्व शाळांमध्ये गुणवत्तावाढीसाठी नियोजन केले असुन आमचे सर्व नगरसेवक यासाठी प्रयत्नशील राहतील व या शाळांच्या विकासासाठी आम्ही निधीची कमतरता भासू देणार नाही असे भाजपचे शहर अध्यक्ष योगेश गोगावले म्हणाले.भाजप चे प्रभाग क्र १३ मधील नगरसेविका मंजुश्री खर्डेकर,नगरसेविका माधुरीताई सहस्त्रबुद्धे व नगरसेवक दीपक पोटे यांच्या निधीतून एरंडवण्यातील पंडित दीनदयाळ उपाध्याय शाळेतील ७ वर्ग खोल्या बांधणे,मैदान विकसित करणे,वैज्ञानिक खेळणी बसविणे व कंपाउंड वॉल वर बोलक्या भिंती करणे (त्यावर उत्तम चित्र काढणे) यासह विविध विकास कामांचे भूमीपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते.भाजप पुणे शहरात दहा शाळांत क्रीडा केंद्र उभारणार असून त्यातील पहिला मान या शाळेने मिळविला असून ही शाळा आदर्श शाळा म्हणून नावलौकिक मिळवेल असा विश्वास वाटतो असे ही मत योगेश गोगावले यांनी व्यक्त केले.नगरसेवक दीपक पोटे म्हणाले ” मी ह्या शाळेतील मैदान बघितल्यावर त्याचे उत्तम क्रीडांगणात रूपांतर करता येउ शकते हे ओळखले व युवा मोर्चा शहर अध्यक्ष म्हणून क्रीडा परिषदेच्या वेळी योगेशदादा नी क्रीडा केंद्र निर्माण करण्याची केलेली घोषणा आठवली व या मैदानासाठी निधी ची तरतूद केली.येथे चांगले खेळाडू निर्माण होतील असा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला.
नगरसेविका मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या ” मी शिक्षण मंडळ सदस्य असल्यापासून या शाळेतील विविध विकास कामे व उपक्रमांशी जोडले गेले व येथील ७०० ची पटसंख्या बघून या शाळेच्या विकासावर लक्ष केंद्रित केले.येथील गरज लक्षात घेऊन शाळेतील शिक्षण आठवी पर्यंत करुन घेतले आहे व पुढील वर्षापासून येथे नववी दहावी चे वर्ग ही सुरु होतील असे ही त्यांनी सांगितले.तसेच ह्या शाळेशेजारीच अनेक नावाजलेल्या शाळा आहेत मात्र आमचे विद्यार्थी ही गुणवान असून त्यांना खासगी शाळांच्या तोडीस तोड सुविधा मिळाव्यात यासाठी येथे विविध विकास कामांचे भूमीपूजन केले आहे.
नगरसेविका माधुरी सहस्त्रबुद्धे यांनी शिक्षकांची संख्या वाढवली पाहिजे असे सांगतानाच प्रभागातील दोन्ही शाळा अद्ययावत करणार असल्याची ग्वाही दिली.तसेच अभ्यासाबरोबरच मुलांनी खेळात ही प्रगती केली पाहिजे असे ही त्या म्हणाल्या.
यावेळी नगरसेवक जयंत भावे,भाजपचे शहर उपाध्यक्ष संदीप खर्डेकर,राजेंद्र येडे,बाळासाहेब धनवे,राज तांबोळी,सुयश गोडबोले,माणिकताई दीक्षीत,एड प्राची बगाटे,अपर्णा लोणारे,जनार्दन क्षीरसागर,प्रतीक ढावरे,इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या मुख्याध्यापिका एलिझाबेथ काकडे,मराठी माध्यमाच्या शशिकला चव्हाण मॅडम,पालक शिक्षक संघाचे श्री बहादूर इ नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी भाजपचे अल्पसंख्यांक आघाडीचे शहर सरचिटणीस राज तांबोळी यांचा वाढदिवसानिमित्त विशेष सत्कार करण्यात आला.मुख्याध्यापिका एलिझाबेथ काकडे यांनी प्रास्ताविक तर सविता जाधव यांनी आभार प्रदर्शन केले.