पौड रस्ता घेणार मोकळा श्वास….मेट्रोच्या कामामुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी विविध उपाययोजना…
पुणे-पौड रस्त्यावर आयडियल कॉलनी चौक ते वनाझ या भागात मेट्रोचे काम वेग घेत आहे व त्यामुळे येथे रोजच वाहतूक कोंडी होत आहे.यावर मार्ग काढण्यासाठी विविध उपाययोजना करण्याची निकड लक्षात घेउन आज सकाळी स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ व भाजप चे शहर उपाध्यक्ष संदीप खर्डेकर यांच्या पुढाकाराने सर्व संबंधित यंत्रणांसमवेत या परिसराची पाहणी करण्यात आली.यावेळी महामेट्रो चे चीफ प्रोजेक्ट मॅनेजर गौतम बिरहाडे,रितेश गर्ग,नागार्जुना कंस्ट्रकशन कंपनीचे नामदेव गव्हाणे,सहाय्यक पोलिस आयुक्त वाहतूक प्रभाकर ढमाले,पोलिस निरीक्षक प्रतिभा जोशी,प्रभाग समितीचे अध्यक्ष दिलीप वेडे पाटील,स्थानिक नगरसेविका हर्षालीताई माथवड,वासंतीताई जाधव,अल्पना वर्पे,किरण दगडे पाटील,डॉ श्रद्धा प्रभुणे पाठक,यांच्या सह डॉ संदीप बुटाला,दुष्यंत मोहोळ,माजी नगरसेवक दिलीप उंबरकर,गणेश वर्पे,नवनाथ जाधव,दिनेश माथवड,ज्ञानेश्वर मोहोळ,अशोक प्रभुणे,पतित पावन संघटनेचे कार्याध्यक्ष सीताराम खाडे,यांच्यासह नागरिक ही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी वाहतूक कोंडी टाळून नागरिकांना दिलासा देण्याच्या दृष्टीने सर्वानुमते खालील निर्णय घेण्यात आले…..
१) एम आय टी शाळा चौक ते आयडियल कॉलनी चौकादरम्यान रस्त्याच्या मधोमध मेट्रो च्या पिलर चे काम केले जाणार असुन पिलर च्या दोन्ही बाजुने एकेरी वाहतूक सुरु ठेवण्यात येइल.
२) वनाझ कंपनी कडुन पौड फाट्याकडे जाताना कृष्णा हॉस्पिटल समोर अजंठा एव्हेन्यू कडे जाणारा रस्त्याचा छेद प्रायोगिक तत्त्वावर बंद करण्यात येणार असुन नागरिकांना आयडियल कॉलनी चौक (आनंदनगर ) येथुन यु टर्न घेउन अजंठा एव्हेन्यू कडे जाता येइल.दोन दिवसांनी आवश्यक बदल करुन दहा दिवस प्रायोगिक तत्त्वावर हा बदल अमलात आणला जाणार आहे.
३) प्रतीकनगर येथे असलेले म्हसोबा मंदिर हे नागरिकांचे श्रद्धास्थान आहे मात्र येथील नागरिकांशी चर्चा करुन वाहतूकीस अडथळा ठरणारे हे मंदिर पर्यायी जागेत स्थानांतरित करण्याबाबत सर्वांनी सहमती दर्शविली.
४) संपूर्ण पौड रस्ता हा नो पार्किंग नो हॉल्टिंग झोन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
५) महावितरण चे काही डी पी व विद्युत पोल ही हलविण्यात येणार आहेत.
६) शिवतीर्थनगर समोरील रस्ता मात्र क्रॉसिंग साठी खुला ठेवण्यात येणार असल्याचे मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.
७) मात्र येथील पी एम पी एल चा थांबा स्थलांतरित करणे व दोन थांबे मागे पदपथावर हलविण्याबाबत ही एकमत झाले.
८) वनाझ समोरील एस टी बस थांबा हलविणे व तेथील अनावश्यकरित्या उभारलेले ६ बस शेड काढून टाकण्याचा ही निर्णय घेण्यात आला.
९) अनेक ठिकाणी पदपथ लहान करणे व दुचाकी पार्किंग साठी रॅंप करणेबाबत ही निर्णय घेण्यात आले.
१०) तसेच संपूर्ण रस्त्यावर ट्रॅफिक वार्डन नेमणे व सायंकाळी गर्दीच्या वेळी वाहतूक नियंत्रण करण्याबाबतचे नियोजन करण्यात आले.
११) सायंकाळी ह्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करुन वडा /भजी /भेळ इ विक्रीसाठी हातगाड्या उभ्या राहतात व त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडते अशी तक्रार स्थानिक नागरिकांनी केली असता त्यावर कारवाईचे आश्वासन देण्यात आले.
सर्व विषयांचा मी स्वतः पाठपुरावा करणार असुन येत्या दहा दिवसांत घेतलेले निर्णय अमलात आणण्यासाठी प्रयत्नरत असल्याचे स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ म्हणाले.
अवघ्या सहा महिन्यात पौड रस्त्यावरील पिलर उभे राहतील असा मेट्रो चा प्लॅन असुन तोपर्यंत कोथरूडकराना त्रास होवु नये यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे संदीप खर्डेकर यांनी सांगितले.