उद्या मुठा नदीत पाणी सोडणार
पुणे : खडकवासला धरण 91टक्के भरले असून उद्या सकाळी (सोमवारी) खडकवासला धरणातून मुठा नदीत 2 हजार क्यूसेक पाणी सोड्ण्यात येणार आहे. जलसंपदा विभागाकडून ही माहिती देण्यात आली.
दरम्यान खडकवासला धरणसखळीतील पाणीसाठा 16.29 टीएमसी (55 .89 टक्के) झाला आहे. शहराला पुढील वर्षभर पुरेल एवढे हे पाणी आहे. दरम्यान, खडकवासला धरणसाखळीतील धरणांचा पाणी साठा रविवारी सकाळी 15.47 टीएमसी (53.10) टक्के होता. या साठयात वाढ होऊन सायंकाळी 5 वाजता हा साठा 16.29 टीएमसी (55.89 टक्के ) झाला आहे. त्यात खडकवासला धरण 91 टक्के भरले असून या धरणात 1.80 टीमसी पाणीसाठा आहे. या धरणाची साठवण क्षमता 1.97 टीएमसी आहे. खडकवासल्या पाठोपाठ पानशेत धरणाच्या पाणीसाठयातही मोठी वाढ होत आहे. या धरणातही रविवारी सायंकाळी 7.52 टीएमसी ( 71 टक्के) पाणीसाठा झाला आहे. तर वरसगाव धरणातील पाणीसाठा 5.37 टीएमसी ( 42 टक्के) झाला असून टेमघर धरणाचा पाणीसाठा 1.60 ( 43 टक्के) झाला आहे. मागील वर्षी याच दिवशी या चारही धरणांचा पाणीसाठा सुमारे 10.06 टीएमसी होता, या साठयाच्या तुलनेत यंदा जुलै मध्येच 6 टीएमसी अधिक पाणीसाठा असल्याचे दिसून येते.
(टीप -येथे देण्यात आलेला व्हिडीओ १२ जुलै २०१६ चा -संग्रही असलेला आहे )