पूवरला जायचे आणि जाता जाता वाटेत तीन महत्त्वाची मंदिरं करायची, असे ठरवले. त्याप्रमाणे सकाळी ४ वाजता उठलो. पहाटे पहाटे आल्लेपीहून प्रवास सुरू झाला. पहाटेचे प्रसन्न वातावरण. रस्त्यात मंदिरं दिसत होती. तसेच मंदिरात जाणाऱ्या भाविकांची लगबगही. हा अनुभव आम्ही जिथे कुठे जात होतो तिकडे आला. तिकडची लोकं तशी श्रद्धाळू आणि धार्मिक. आपल्या परंपरेचा आदर करणारी आणि जोपासणारी. मंदिरांवर रोषणाई केलेली. सर्वत्र स्वच्छता. प्रशस्त आवार आणि सभामंडप. प्रसन्न, चैतन्यमय वातावरण. आजूबाजूचा परिसर पाहण्यात गुंग झालेलो आम्ही वायकोमला कधी येऊन पोहोचलो ते कळलेच नाही. सकाळचे ५ वाजले होते. समोरच वायकोम महादेव मंदिराचे प्रवेशद्वार होते. पारंपरिक वाद्ये वाजत होती. थोडे पुढे जाऊन उभे राहिलो तर दिसणारे दृश्य डोळे दिपवणारे होते. सजवलेले हत्ती…त्यावर बसलेली व्यक्ती बहुदा मुख्य पुजारी असावी, त्यामागून पालखी, प्रदक्षिणा घालणारे भक्तगण आणि या सर्वांच्या पुढे बंदूकधारी शिपाई. अगदी शाही लवाजमा होता! हत्ती प्रदक्षिणा घालून मुख्य मंदिराच्या गाभाऱ्याशी आला की तिथे उभे असलेले पुजारी मंत्रोच्चार करत असावेत. आणि परत पुढची प्रदक्षिणा घालायला सुरूवात.
एक-दोन प्रदक्षिणेनंतर हत्तीने गाभाऱ्यासमोर स्वतःलाही प्रदक्षिणा घातली. आम्ही सगळेच मंत्रमुग्ध होऊन हा सोहळा याची देही याची डोळा पाहात होतो. प्रदक्षिणेचा हा सोहळा पार पडल्यानंतर भक्तांसाठी दर्शन खुले झाले. वायकोम महादेवाचे दर्शन घेऊन झाल्यानंतर पुढे एत्तुमनूर शिव मंदिर आणि कडूथुरुथी महादेवाचे मंदिर या दोन्हीचे दर्शनही घेतले. असं म्हणतात की या तिन्ही ठिकाणचे दर्शन घेतले की कैलासाचे दर्शन झाल्याचे भाग्य मिळते. सकाळी ८ च्या आतच आमची तीन मंदिरं करून झाली होती, आता पुढे पूवर आयलँडच्या दिशेने प्रवास सुरू झाला. पूवर महिंद्रा क्लब पोहोचेपर्यंत दुपार झाली होती. सकाळपासून प्रवास करून दमलोही होतो. आमच्या रूमची रचना केरळी स्थापत्य शैलीतील घरासारखी होती, अगदी प्रवेशद्वार सुद्धा! आतमध्ये स्वतंत्र छोटा स्विमिंग पूल होता. पूवर आयलँडचं स्वतःचं एक वेगळेपण होतं जे दुसऱ्या दिवशी मॅन्ग्रोव्ह बॅक वॉटर करताना अनुभवलं. तिथेही नदी आणि समुद्राचा संगम पाहायला मिळाला. या दोहोंच्या मधेच किनाऱ्यावर आम्ही उतरलो. शुभ्र फेसाळणाऱ्या लाटा किनाऱ्यावर येऊन आदळत होत्या. समोर अथांग निळाशार समुद्र. फोटो तरी किती काढायचे. हा अनुभवलेला क्षण गच्च डोळे मिटून आठवणीतल्या कॅमेऱ्यातच बंदिस्त करून टाकला.
गुरुवायूरपासून सुरू झालेली ट्रिप पूवरला येऊन संपली. परत निघण्याचा दिवस उजाडला. या ८ दिवसांत अनुभवलेलं सगळं काही आठवलं. स्वच्छ सुंदर रस्ते, मंदिराचं पावित्र्य, निळाशार अथांग सागर आणि महत्त्वाचं म्हणजे अपघाताच्या दरम्यान झालेलं माणुसकीचे दर्शन. आमच्या आधीचा ड्रायव्हर राकेशही कोचीला आम्हाला भेटायला आला होता. त्याचे आणि मुस्तफाचे आभार मानून आम्ही मुंबईकडे प्रयाण केले.
सगळे सुखरूप परत आलो म्हणूनच तर मस्त झाली ना आपली केरळ ट्रिप. मुंबई एअरपोर्टवर आम्हा सगळ्यांच्या तोंडी हे एकच वाक्य होते आणि चेहऱ्यावर सगळे नीट पार पडल्याचे समाधान.
म्हणतात ना…प्रवासातल्या आठवणींचा सुगंध झाला की प्रवास सुरूच राहातो…संपत नाही आणि तसच झालं… पुढील ट्रिप कोणती यावर चर्चाही सुरू झाली…
लेखिका – पूर्णिमा नार्वेकर, दहिसर

