मुन्नार ते आल्लेपी जवळजवळ ५ तासांचा प्रवास होता. त्यात मधेच मुन्नार इथे स्पाईस गार्डनला खरेदी करायची होती. खरंतर आदल्या दिवशी चॉकलेट्स आणि मसाले घेऊन झाले होते पण खरेदी म्हणजे बायकांचा वीक पॉईंट! स्पाईस गार्डनला खरेदी करून निघेपर्यंत आल्लेपीला पोहोचायला उशीरच झाला. संपूर्ण प्रवासात ड्रायव्हर मुस्तफाला ‘किती वाजता पोहोचणार’ असं वारंवार विचारून भंडावून सोडलं होतं. हॉटेल रमाडा – आल्लेपीला पोहोचेपर्यंत संध्याकाळचे ६ वाजले होते. आमचे कोची स्थायिक फॅमिली फ्रेंड रवी ज्यांचा बिझनेस अल्लेप्पीला आहे ते भेटायला आहे होते, त्यामुळे सगळी पुरुष मंडळी (तेजील सोडून) त्यांच्या बरोबर त्यांची ऑरगॅनिक प्रॉडक्टची फॅक्टरी बघण्यासाठी गेले. आम्ही बायका आणि तेजील मस्त हॉटेलचं वातावरण एन्जॉय करत बसलो. आल्लेपी हे ठिकाण बॅकवॉटरसाठी प्रसिद्ध आहे. दुसऱ्या दिवशी थोडा निवांतपणा होता. कारण गेले ४ दिवस सतत आम्ही पहाटे लवकर उठत होतो. रवीने आमच्या पुढील पूर्ण दिवसभराचे प्लानिंग आधीच करून टाकले होते. त्याप्रमाणे आधी स्पेशल केरळ नॉनव्हेज जेवण आणि माझं एकटीचं शाकाहारी ‘सदया’चा बेत मिनी कल्पकवाडी या धाब्यावर केला होता. मिनी कल्पकवाडी इथलं जेवण म्हणजे मांसाहारी लोकांसाठी पुरेपूर मेजवानीच. सगळीकडे मात्र भाषेचा खूप प्रॉब्लेम येत होता. मग आम्ही मुस्तफाला त्यांच्या भाषेत सांगायला सांगायचो, नाहीतर खाणाखुणा करून दाखवायचो. कल्पकवाडीत जेवणाचा आस्वाद घेताना लक्षातच राहिले नाही की ४ वाजताची हाऊसबोट बुक केली आहे. मग काय पळापळ. हाऊसबोट आम्हाला वाटले होते त्या जेट्टीवर आलीच नाही, मग आम्ही त्या बोटमालकाच्या घराकडे गेलो. तिथे तर काय गाड्यांसारख्या ३-४ हाऊसबोटी पार्क केल्या होत्या. गम्मतच वाटली हे सगळं बघून. आमची हाऊसबोट सर्वांत शेवटची होती. एका हाऊसबोटीमधून दुसऱ्या हाऊसबोटीवर जाण्यासाठी मध्ये फळ्या टाकल्या होत्या. त्या सगळ्या पार करत आम्ही आमच्या ‘रिवराईन’ हाऊसबोटीवर पोहोचलो. शेफ कन्नन आणि बोटीचा खलाशी आमची वाटच पाहात होते. ३ बेडरूम असलेली मोठी हाऊसबोट रवीने आमच्यासाठी बुक केली होती. वेलकम ड्रिंकने बोटीवर आमचे स्वागत केले गेले आणि बॅकवॉटरची सफर चालू झाली. आजूबाजूला किनाऱ्यावर छोटी छोटी तर काही ठिकाणी टुमदार घरे आणि बाहेर बोट पार्क केलेली, हे सगळं बघायला खूप मजा वाटत होती. बोटीच्या वर डेकवर आम्ही सगळे निवांत बसलो होतो. समोर अथांग सागर आणि वर निरभ्र आकाश. असे निवांत क्षण खूप कमी वेळा अनुभवायला मिळतात. भावना मावशीला तर सर्व जुनी गाणी आठवत होती. मध्येच एका किनाऱ्यावरील गावात आम्ही उतरलो. मासळी बाजार भरला होता. ते छोटे गाव बघायला पण खूप मजा येत होती. दोन्ही बाजूला पाणी आणि मध्येच बेटावर ही छोटी छोटी गावे. पावसाळ्यात पूर परिस्थितीमध्ये या सर्वांना आल्लेपीला येऊन राहावे लागते. नुकसानही बरेच होते. संध्याकाळचे ६ वाजले होते, सूर्य अस्ताला आला होता. ते दृश्य अविस्मरणीय होते. हाऊसबोटचा एक वेगळाच अनुभव आणि खूप दिवसांनी मिळालेला निवांतपणा सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. शेफ कन्ननने संध्याकाळच्या नाश्त्यात चहासोबत मस्त गरमागरम कांद्याची भजी केली होती. आता आमची बोट किनाऱ्याला लागली होती आणि बोटहाऊसच्या मालकीच्या पार्किंग स्लॉटमध्ये बोट पार्क केली होती. कारण संध्याकाळी ६.३० नंतर हाऊसबोटींना पाण्यात लोटण्याची परवानगी नव्हती म्हणून मग त्या एका ठिकाणी उभ्या करून ठेवाव्या लागत होत्या. रात्रीचे जेवण बोटीवरच होते. आमच्या फर्माईशीप्रमाणे शेफ कन्ननने जेवणाचा बेत केला होता. मांसाहारी प्रमाणेच शाकाहारी जेवणात सुद्धा विविध पदार्थ केले होते. जेवण खूपच चविष्ट होते. कन्नन आग्रह करून वाढत होता. भावना मावशीने त्याला खास दाद दिली. कन्ननच्या मांसाहारी जेवणात सुद्धा सात्विकता होती. उंचपुरी देहयष्टी आणि चेहऱ्यावर शांत भाव असलेल्या कन्ननच्या हातात मात्र जादू होती. जेवणाचा मनमुराद आस्वाद घेऊन आम्ही हाऊसबोटीवरून हॉटेलवर आलो.
पुढचे आणि शेवटचे डेस्टिनेशन होते पूवर आयलँड. त्यासाठी दुसऱ्या दिवशी पुन्हा सकाळी ४ वाजता उठायचे होते. कारण महत्त्वाची तीन मंदिरं करून मग पुढे पूवरला जायचे होते. … (क्रमशः)
– पूर्णिमा नार्वेकर, दहिसर

