मुंबई- ज्या लाखो मतदारांनी विश्वास टाकल्यानंतर आमदार होऊन आपण सभागृहापर्यंत पोहोचतो , त्यांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की, आपण इथे कुत्री, मांजर आणि कोंबड्यांचं प्रतिनिधीत्व करत नाहीत. असे वागलो तर लाखो मतदारांच्या विश्वासाला तडा जाईल. सदस्यांनी आपले वर्तन लाइव्ह होणार्या बातम्यांद्वारे जनता पाहत असते म्हणत उपमुख्यमंत्र्यांनीआमदारांचे कान टोचले आहे.’असे वागणे म्हणजे लाखो मतदारांचा अपमान केल्यासारखे आहे. मतदारांना काय वाटेल, आपला माणूस तिथे जातो आणि अशा पद्धतीनं आवाज काढतो, टवाळी करतो? त्यामुळे सगळ्यांनीच चारही प्रमुख प्रक्ष, इतर अपक्ष सदस्यांनी ही गोष्ट गांभीर्याने घ्यायला हवे’ असे देखील अजित पवार म्हणाले.विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीच्या सुरुवातीलाही विरोधकांकडून पायऱ्यांवर आंदोलन केले जात होती. ते सरकारविरोधात घोषणाबाजी करत होते. यावेळी आमदार नितेश राणे यांनी आमदार आदित्य ठाकरे येताच म्याव-म्याव असा अवाज काढला होता.या प्रकरणावरुन आज उपमुख्यमंत्री अजित पवारांनी यावरुन आमदारांचे कान टोचले आहे.
विधिमंडळात सदस्यांनी संसदीय राजशिष्टाचार व आचारसंहितेचे पालन करावे, यासाठी आज विधिमंडळात सर्वपक्षीय नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी विधानसभेत याविषयी सविस्तर भूमिका मांडली. सभागृहाचे कामकाज सुरळित चालण्यासाठी विधिमंडळातील सर्वच पक्षाच्या आमदारांनी नियमांचे पालन केले पाहीजे, अशा शब्दात अजितदादांनी सदस्यांचे कान टोचले.विधिमंडळ सर्वोच्च असून इतक्या वर्षांच्या सभागृहाच्या प्रदीर्घ वाटचालीत विधिमंडळ सभागृहाने उच्च मूल्ये प्रस्थापित केली आहेत. त्यामुळे प्रत्येक आमदाराने आदर्श आचारसंहितेचे पालन करत जबाबदारीने वागले पाहीजे. विधानसभेत आमदार निवडून आल्यानंतर तो सार्वजनिक जीवनात कसा वागतो? सभागृहात कसे वर्तन करतो? यावरुन त्याची प्रतिमा ठरत असते. पण काही सदस्यांच्या चुकीच्या वर्तणुकीमुळे सभागृहाच्या प्रतिमेला तडा गेला आहे. आता सर्वांनीच याचा अंतर्मुख होऊन विचार केला पाहीजे, असे मत अजितदादांनी व्यक्त केले.अजितदादा पुढे म्हणाले की, “सुरूवातीच्या काळात आम्ही निवडून आलो तेव्हा विधिमंडळ कामकाजाचे थेट प्रक्षेपण होत नव्हते. आता दोन्ही सभागृहांचे कामकाज लाईव्ह होते. राज्य आणि माध्यमे आपल्याकडे पाहात आहेत. त्यामुळे प्रत्येकाने संसदीय शिष्टाचारांचे पालन करणे आवश्यक आहे. आमदारांना दोन-दोन लाख मतदार मतदान करुन विधानसभेत पाठवत असतात. त्यांचे प्रतिनिधीत्व आमदाराने करायचे असते. कुत्रे, मांजर, कोंबड्या या प्राण्यांचे प्रतिनिधीत्व आपण करत नाही, हे सर्वांनी ध्यानात ठेवावे.”आगामी काळात आमदारांनी सभागृहात तारतम्य ठेवून बोलावे. सभागृहाची शान आणि मान राखण्याची जबाबदारी प्रत्येक सदस्याची असे आवाहन अजितदादांनी केले.

