केंद्रीय आयुष मंत्रालय कर्वे समाजसेवा संस्थेबरोबर काम करण्यास उत्सुक
पुणे :
‘केंद्र सरकारमध्ये आपणाकडे जबाबदारी असणार्या आयुष मंत्रालयामार्फत समाजामध्ये आरोग्यविषयक विविध उपक्रमाची अंमलबजावणी करावयाची असून त्यासाठी योग, आयुर्वेद आणि पारंपरिक औषधींना प्रोत्साहन देण्यासाठी सर्व स्तरांवर ग्रामीण भागांमध्ये ‘वेलनेस सेंटर्स’ उभारणीसाठी मंत्रालय प्रयत्नशील असल्याचे सांगत ‘कर्वे समाज सेवा संस्था, पुणे (Karve Institute of Social Service) सारख्या देशात नावाजलेल्या, प्रामाणिक व पारदर्शीपणाने काम करणार्या संस्थेची जर याकामी आपणास साथ मिळाली तर दुधात साखर मिळाल्यासारखे होईल,’ असे प्रतिपादन माजी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री तसेच केंद्रीय आयुष्मंत्री (स्वतंत्र प्रभार) श्रीपाद नाईक यांनी कर्वे समाजसेवा संस्थेस दिलेल्या सदिच्छा भेटीप्रसंगी केले.
‘भविष्यात कर्वे समाज सेवा संस्थेच्या कंपन्यांचे सामाजिक उत्तरदायित्व या विभागाच्या (सी .एस .आर. सेल) मदतीने समाजात राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांच्या अंमलबजावणीसाठी व आरोग्य क्षेत्रामध्ये आयुष् मंत्रालय व कर्वे समाज सेवा संस्थेच्या संयुक्त विद्यमाने नव्याने प्रकल्प हाती घेऊन त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी आपले मंत्रालय उत्सुक असल्याचे’ मत देखील श्रीपाद नाईक यांनी यावेळी व्यक्त केले.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष सदानंद देशपांडे, सचिव शिव कुमार, खजिनदार दीपक जानोरिकर, संचालक डॉ. दीपक वालोकर व संस्थेच्या व्यवस्थापकिय मंडळाचे सदस्य मधुकर पाठक उपस्थित होते.
भेटीदरम्यान आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी कर्वे समाजसेवा संस्थेच्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला. संस्थेच्या स्थापनेपासून आजपर्यंत समाजामध्ये केलेल्या उत्तुंग कार्यासाठी कौतुक केले, तसेच कर्वे सारख्या देशातील नावाजलेल्या समाजकार्य महाविद्यालयाला भेट देण्याचा आपला मानस पूर्ण झाल्याचे सांगितले. संस्थेने ज्या गतीने शिक्षण व सामाजिक क्षेत्रामध्ये काम केले आहे ते वाखाणण्यासारखे असून त्यामुळे नक्कीच राष्ट्रीय विकासाला गती मिळेल. तसेच खर्या लोकशाहीची फळे देखील समाजाला चाखायला मिळतील असा विश्वास देखील आयुष्मंत्री श्रीपाद नाईक यांनी यावेळी व्यक्त केला.
संस्थेचे संचालक डॉ दीपक वालोकर यांनी कर्वे समाज सेवा संस्थेची स्थापना, इतिहास व संपूर्ण कार्याबद्दल तसेच संस्थेच्या विविध विभागांमार्फत राबविण्यात येत असलेल्या सर्व प्रकल्प, उपक्रम व अभ्यासक्रमांविषयी माहिती दिली. ‘सध्या आयुष मंत्रालयाद्वारे आरोग्य क्षेत्रामध्ये करण्यात येत असलेले कार्य पाहता, आयुष्य मंत्रालयाने सर्व शासकीय, सार्वजनिक, खासगी व इतर कंपन्यांनी एक तरी आरोग्य व योगा / पर्यायी औषध यासंबंधी प्रकल्प हाती घ्यावा’ असे निर्देश देण्यात यावेत अशी अपेक्षा व्यक्त केली.
कंपन्यांचे सामाजिक उत्तरदायित्व विभाग प्रमुख (सी.एस.आर.सेल) प्रा.महेश ठाकुर यांनी संस्था व सी.एस.आर.सेल च्या माध्यमातून संस्थेद्वारा देशभरातील विविध नामांकित कंपन्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व विभागांच्या मदतीने राबविण्यात येत असलेल्या प्रकल्पांविषयी सादरीकरण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, स्वागत व प्रास्ताविक संस्थेचे संचालक डॉ दीपक वालोंकर यांनी केले तर आभार प्रा. महेश ठाकूर यांनी मानले.