पुणे- लवकरच गाय ही राष्ट्रीय पशु म्हणून घोषित करावी म्हणजे गायीचे रक्षण राष्ट्रीय रक्षण होईल , गो हिंसा थांबवावी असे आवाहन डॉ सुब्रमण्यम स्वामी यांनी येथे केले .
विराट हिंदुस्थान संगम आणि इस्कॉन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने कात्रज कोंढवा रोडवरील इस्कॉन मंदिराच्या प्रांगणात डॉ सुब्रमण्यम स्वामींच्या उपस्थितीत गो विज्ञान परिषद आयोजित करण्यात आलेली होती.
या परिषदेसाठी पुणे आणि परिसरातील ७००हुन अधिक गो प्रेमींनी उपस्थिती लावली.
भारतीय देशी गायींचे संगोपन,जतन, अध्यात्मिक व वैज्ञानिक महत्त्व ,सेंद्रिय शेती तसेच विविध व्याधींवर उपयोग , उपचार तसेच गायींचे ग्रामीण उत्थानासाठीचे महत्व या विषयांवर चर्चा झाली.
परिषदेत प्रख्यात लेखक श्री सहदेव दास, गुजरातचे प्रसिद्ध गोपालक श्री गोपाळ सुतारिया, भाजपच्या प्रवक्त्या सुश्री श्वेता शालिनी, डॉ अभिषेक कुकेमनी, श्री संदीप संघवी या प्रभूतींनी मार्गदर्शन केले.
परिषदेची सुरुवात श्रीरूप गोस्वामींच्या हस्ते गो पूजनाने झाली. डॉ स्वामी यांनी आपल्या भाषणात पाश्चात्य देश आपल्या योगांचं जसा अनुकरण करत आहेत तसेच लवकरच भारतीय वंशाच्या गो रक्षणाचा देखील कित्ता गिरवतील असे म्हणाले किंबहुना आपण आपल्या संस्कृतीचे म्हणजे आपल्याच देशी भारतीय गायींचे रक्षण करण्यात जी कमतरता दाखवत आहोत त्यावर प्रहार केला. आधीच्या सरकाराने हेतुपुरस्सर केलेल्या भारतीय गो वंशाचा अतोनात नुकसान याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.
या पुढे तरी किमान गो हत्या विषयात कडक कायदे करण्यासंबंधी सूचना केल्या , तसेच याचा पाठपुरावा करून मार्गी लावण्याचे सूतोवाच केले.
भारतीय गाय एक साधारण प्राणी नसून भारतीय संस्कृतीचे आणि मनुष्यजातीचे मूळ प्रतीक असून याचे संरक्षण हे जातीयवादी नसून मनुष्यवाद असल्याचे सांगितले. गौहत्याबंदी ही हिंदुत्ववादी च्या रक्षणासाठी नव्हे तर आरोग्यदायी जीवनशैलीसाठी उपयुक्त आहे. जसे मोर हा राष्ट्रीय पक्षी आहे तसेच गाय हा राष्ट्रीय पशु घोषित करण्याची मागणी त्यांनी केली ह्या मुळे मग ही राष्ट्रीय संरक्षणाची जबाबदारी होईल .
कार्यक्रमात डॉ स्वामींच्या हस्ते श्री प्रमोद जगताप – गोपालन , श्री मिलिंद एकबोटे -गो रक्षण , पुणे पंजरापोलचे श्री बोथरा आणि श्री रांका- गो संवर्धन, डॉ माने – गो चिकित्सा यांनी या विषयांत केलेल्या कार्याबद्दल स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री संजय भोसले यांनी केले. इस्कॉन मंदिराचे उपाध्यक्ष श्री गुरुचरण प्रभू , डॉ जनार्दन चितोडे -सेक्रेटरी गो विज्ञान परिषद , प्रसाद कारखानीस -इस्कॉन चे प्रवक्ते तसेच विराट हिंदुस्थान संगम चे जनरल सेक्रेटरी जगदीश शेट्टी , प्रदेश अध्यक्ष् डॉ अजय संख्ये , सुश्री राजलक्ष्मी जोशी, श्री राजीव हरसोरा, पुणे विभाग प्रमुख मिलिंद भावसार, शंतनू नंदगुडे इतर उपस्थित होते.