मराठवाड्यातील ग्रामीण भागाला दुष्काळाचा मोठा तडाखा बसला आहे. प्रसारमाध्यमांतून जाहीर झालेल्या माहितीनुसार दुष्काळामुळे येथील शेतकरी उद्ध्वस्त झाले असून त्यातील ४०० शेतकऱ्यांनी निराशेने आत्महत्या केल्या आहेत. अशा शेतकऱ्यांच्या विधवांच्या हालअपेष्टा दूर करतानाच यापुढे शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी ‘करिश्मा केअर फाऊंडेशन’ ही स्वयंसेवी संस्था (एनजीओ) सक्रिय झाली आहे. ‘क्रिएटिंग मॅजिक वुईथ कम्पॅशन,’ हे घोषवाक्य घेऊन या संस्थेने बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील ३१ गावांत तातडीने २४००० किलो धान्याचे वाटप स्वतः केले आहे, तसेच गेले तीन महिने प्रत्येकी ५०० लिटर क्षमतेच्या पाणी साठवण्याच्या ५५ टाक्या पुरवल्या आहेत. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवांना या संस्थेने अर्थसाह्याचे धनादेश, धान्य व नवे कपडे यांचे वाटप केले आहे. ‘करिश्मा केअर फाऊंडेशन’च्या या प्रयत्नांची बीडच्या प्रशासनाकडून प्रशंसा करण्यात आली आहे. संस्थेने भेट दिलेल्या गावांमध्ये नागथाळा, बावी, जामगाव, पुंगळगाव, शिरपूर, हातोळा, दाढेगाव, ब्रह्मगाव, भवरवाडी व कारवेवाडी आदींचा समावेश आहे.
यासंदर्भात माहिती देताना ‘करिश्मा केअर फाऊंडेशन’च्या संस्थापक व व्यवस्थापकीय विश्वस्त नीलम तुतेजा म्हणाल्या, की दुष्काळाविरुद्ध लढण्यासाठी आम्ही गुढीपाडव्याच्या काळात धान्य संकलन मोहीम राबवली. त्याला विविध सामाजिक संघटना, शाळा, कंपन्या, मित्र परिवार व हितचिंतकांचा भरघोस पाठिंबा मिळाला. आमची ही स्वयंसेवी संस्था ग्रामीण महाराष्ट्रातील गरीब, वंचित व गरजू व्यक्तींच्या उन्नतीसाठी कष्ट घेते आणि एकंदर ग्रामीण विकासासाठी कार्य करण्यावर तिची श्रद्धा आहे. ती केवळ विशिष्ट धर्मादाय गोष्टींवर भर देत नसून अधिक विशाल परिप्रेक्ष्यात कार्य़रत आहे. नीलम तुतेजा या दुष्काळाशी लढणाऱ्या व्यक्तींमधील बहुधा पहिल्या महिला असाव्यात, ज्यांनी या कामी पुढाकार घेऊन दुष्काळग्रस्त गावांना भेट देण्याचे धाडस दाखवले आहे आणि शेतकऱ्यांशी वैयक्तिक संपर्क साधला आहे.
‘करिश्मा केअर फाऊंडेशन’ कर्करोग निगा शिबीरे, स्वच्छता योजना, आरोग्य शिबीरे, बालकांसाठी शिक्षण, महिला सक्षमीकरण कार्यक्रम, वृक्षारोपण, दुष्काळी ग्रामीण भागातील गरीब शेतकरी व त्यांच्या कुटूंबांना मदत आदी विविध उपक्रम राबवत आहे.
‘करिश्मा केअर फाऊंडेशन’तर्फे अनेक शिबीरेही घेण्यात आली आहेत. त्यात मुलांसाठी आरोग्य शिबीरे, सर्व्हायकल कॅन्सर शिबीर, तंबाखूच्या दुष्परिणामांवर जागृती कार्यक्रम, गावांमध्ये नव्या कपड्यांचे वाटप व मराठवाड्यातील दुष्काळाबाबत जागृती निर्माण करण्यासाठी महिला दिन कार्यक्रम आदींचा समावेश आहे. या उपक्रमांना जनतेतून मोठ्या प्रमाणावर प्रशंसा लाभली असून त्याची प्रसिद्धी मुद्रित व इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमांतून झाली आहे.
या फाऊंडेशनने मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील दुष्काळबाधित कुटूंबांच्या स्थितीकडे लक्ष वेधण्यासाठी पुण्यात कोरेगाव पार्कमध्ये गेल्या २८ व २९ मे रोजी प्रदर्शिनी २०१६ या प्रदर्शनाचे आयोजन केले. दुष्काळामुळे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले आणि त्यांना संकटात दिलासा व मदत देण्याच्या हेतूने धनादेश देण्यात आले. यासाठीचा निधी प्रामुख्याने कार्य़क्रमस्थळी उभारलेल्या स्टॉल्सवरील वस्तू विक्री करुन संकलित करण्यात आला. उर्वरित निधीही बीड जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त गावांत मदत म्हणून पाठवण्यात आला, असे नीलम तुतेजा यांनी नमूद केले.
ग्रामीण भागातील या मदत मोहिमांदरम्यान गावांना प्रत्यक्ष भेटी दिल्याने, तसेच शेतकऱ्यांच्या कुटूंबांपर्यंत पोचल्याने या स्वयंसेवी संस्थेची प्रतिमा व अस्तित्व जनसामान्यांमध्ये उज्ज्वल होण्यास मदत झाली आहे.
नीलम तुतेजा पुढे म्हणाल्या, “नुकतेच आम्ही शेतकऱ्यांना दुष्काळाचा सामना करण्यासाठी एकरनिहाय बियाणे वाटप केले आहे व विविध गावांत गो ग्रीन मराठवाडा ही वृक्षारोपण मोहीम राबवली आहे. गरीब शेतकऱ्यांच्या मुलांच्या कल्याणासाठीही आम्ही काम करत आहोत.” नीलम तुतेजा यांनी स्वतःची स्वयंसेवी संस्था स्थापन करण्यापूर्वी पाच वर्षे सक्रिय समाजसेवेत घालवली आहेत. सामाजिक कार्यासाठी त्यांची समर्पितता व बांधीलकी यांना प्रशंसा मिळाली असून त्यांना या कारणासाठी अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
करिश्मा केअर फाऊंडेशनचे आगामी उपक्रम
· शेतकऱ्यांच्या मुलांचे शिक्षण
· महिला व मुलांसाठी आरोग्य शिबीरे
· मुलांना शालेय गणवेश, पुस्तके, शालेय साहित्य व अभ्यास साधने यांचे वाटप
· दारिद्र्य रेषेखालील शेतकऱ्यांना धान्य वाटप
· कौशल्य विकासासारखे महिला सक्षमीकरण उपक्रम
· दुष्काळामुळे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवांना अर्थसाह्य
“ही केवळ सुरवात आहे. करिश्मा केअर फाऊंडेशनची स्थापना डिसेंबर २०१५ मध्ये झाली. आमची संस्था केवळ सात महिन्यांची आहे आणि आम्हाला खूप मोठी मजल मारायची आहे. शेतकरी व त्यांच्या कुटूंबांसाठी अनेक उपक्रम राबवायचे आहेत. सध्या आम्ही वर उल्लेख केलेल्या उपक्रमांवर लक्ष केंद्रित केले आहे. याकामी छोटी-मोठी मदत झाल्यास ती आम्हाला दीर्घकालीन वाटचालीसाठी व संकटग्रस्तांना मदतीचे ध्येय गाठण्यासाठी उपयुक्त ठरेल,” असेही आवाहन नीलम तुतेजा यांनी केले आहे.

