महात्मा गांधींवर वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या महाराज म्हणविणाऱ्या कालीचरणला अखेर आज अटक करण्यात आली आहे. कालीचरणविरोधात महाराष्ट्र आणि छत्तीसगडमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले होते. मध्य प्रदेशमधील खजुराहो येथील बगेश्वरी धाम येथून आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास कालीचरणला अटक करण्यात आली. छत्तीसगड पोलिसांनी ही कारवाई केली आहे. छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये कालीचरण विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर ही कारवाई झाली.
काही दिवसांपूर्वी रायपूर येथे झालेल्या धर्मसंसद कार्यक्रमात कालीचरणने राष्ट्रपीता महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेचे कौतुक केले होते. या वक्तव्यावरुन कालीचरण महाराजाविरोधात संतापाची लाट उसळली होती. त्यानंतरही महाराजाने आपले वादग्रस्त वक्तव्य करणे सुरुच ठेवले होते.
रायपूर, अकोला आणि पुण्यात त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. मागील काही दिवसांपासून छत्तीसगड पोलिसांकडून कालीचरणचा शोध सुरु होता. त्यासाठी महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशातही छत्तीसगड पोलिसांनी शोध घेतला होता. त्यानंतर खजुराहो येथील बागेश्वर धाम येथील एका घरातून कालीचरणला अटक करण्यात आली.
कोण आहे कालीचरण –आठवी पर्यंतच झाले शिक्षण
छत्तीसगढची राजधानी रायपुरमध्ये धर्मसंसद कार्यक्रमाच्या दरम्यान राष्ट्रपीता महात्मा गांधी यांच्या विरुद्ध अपशब्द बोलणारे कालीचरण महाराष्ट्रातील अकोल्यातील शिवाजीनगर या भागात राहतात. कालीचरणचे खरे नाव अभिजीत धनंजय सराग असे असुन तो भावसार समाजाचा आहे. एका साधारण कुंटुंबात जन्मलेल्या अभिजीत सराग यांचे वडिल धनंजय सराग यांचे अकोल्यातील जयन चौक या परिसरात एक मेडिकल शॉप होते.48 वर्षीय कालीचरण महाराज यांचे शिक्षण जिल्हा परिषद शाळेत झाले आहे. विशेष म्हणजे महाराजांचे शिक्षण फक्त आठवीपर्यंत झाले आहे. त्यांच्या नातेवाईकांचे असे म्हणणे आहे की, त्यांनी शालेय शिक्षण कमी घेतले असले तरीही त्यांनी धार्मिक शिक्षण मोठ्या प्रमाणात घेतले आहे
मराठीसह हिंदीवर देखील चागंले प्रभूत्व
कालीचरण महाराज यांचे कुंटुंब गरीब असल्याने त्यांच्या वडिलांनी त्यांना इंदूर येथे आपल्या मावशीकडे पाठवले होते. त्यामुळे महाराजांचे मराठी सोबतच हिंदीवर देखील चांगले प्रभूत्व आहे.
इंदूरमध्ये अनेक वर्ष भय्यूजी महाराजांसोबत राहिले
इंदूरमध्ये असल्याकारणाने कालीचरण हे भय्यूजी महाराज यांच्या आश्रमामध्ये जायचे, जेणेकरुन कालीचरण आणि भय्यूजी महाराज यांच्यात चागंली मैत्री झाली. या आश्रमातून कालीचरण यांनी महाराज ही उपमा मिळण्यास सुरुवात झाली. त्यानंतर अवघ्या काही वर्षातच ते मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झाले.
कालीचरण आपल्या कपाळावर नेहमी लाल ठिपका लावतात. कालीचरण नेहमी आपले केस उघडे ठेवतात आणि कपाळावर एक मोठा लाल ठिपका ठेवतात. ते सहसा लाल रंगाचे कपडे घालतात. सोशल मीडियावर त्यांच्या नावाने अनेक पेजेस तयार करण्यात आली असून त्यांचे लाखो फॉलोअर्स देखील आहेत.
निवडणुकीच्या रिंगणात महाराज
कालीचरण 2017 साली अकोलामध्ये नगरपालिका निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत महाराजांना मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. त्यानंतर या महाराजांनी पुन्हा 2019 मध्ये विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय़ घेतला होता. मात्र काही कारणास्तव त्यांनी निवडणूक लढवली नाही.
शिव तांडव स्त्रोतपासून चर्चेत
कालीचरण महाराज दरवर्षी अकोल्यात होणाऱ्या कांवड़ जत्रेत भाग घेतात. गेल्या वर्षी महाराजांनी मध्य प्रदेशात शिव तांडव स्त्रोत म्हटले होते. तेव्हापासून कालीचरण महाराजांना प्रसिद्धी मिळाल्याचे समजते. शिव तांडव गायिलेला तो व्हिडिओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांनी देखील कालीचरण महाराजांचा तो व्हिडिओ शेअर केला होता.