सध्या मराठी चित्रपटात एकापाठोपाठ एक हिंदीतील तारका आयटम सॉंगवर थिरकताना दिसतायेत. बॉलीवूड आणि टॅालीवूडला आपल्या मोहक अदांनी घायाळ करणारी अभिनेत्री हिना पांचाल आता मराठी चित्रपटात आपला जलवा दाखवणार आहे. श्री धनलक्ष्मी प्रोडक्शन प्रा.लि प्रस्तुत ‘काय झालं कळंना’ या मराठी चित्रपटात हिना पांचाल वर एक धमाकेदार आयटम नंबर चित्रीत झालं आहे.
‘टकमक टकमक नजरा तुमच्या, होऊ दे आता बत्ती गुल’ असे बोल असलेल्या या हटके आयटम सॉंगचे चित्रीकरण नुकतेच झाले. या आयटम सॉंगची कोरीओग्राफी सुजीत कुमार यांनी केली आहे. संगीतकार पंकज पडघन यांचं हे पहिलं आयटम सॉंग आहे. वलय मुलगुंद यांनी हे गीत लिहिले आहे. हे आयटम सॉंग करताना मला खूप मजा आली. प्रेक्षकांनाही हे आयटम सॉंग ठेका धरायला लावेल असा विश्वास हिना यांनी व्यक्त केला. चित्रपटातील हिनाचा हॉट अंदाज मराठी चित्रपटासाठी भन्नाट तडका असणार हे नक्की.
‘काय झालं कळंना’ या चित्रपटातून वेगळ्या धाटणीची हलकी–फुलकी प्रेमकथा पहायला मिळणार आहे. या चित्रपटाची निर्मिती पंकज गुप्ता यांची असून दिग्दर्शन सुचिता शब्बीर यांचं आहे. अरुण नलावडे, संजय खापरे, वंदना वाकनीस, गिरीजा प्रभू, कल्पना जगताप, स्वप्नील काळे, सुयश झुंजुरके, रवी फलटणकर, श्रद्धा सुर्वे, हेमाली कारेकर या कलाकारांनी या चित्रपटात भूमिका साकारल्या आहेत.