सीए विद्यार्थ्यांसाठीच्या ‘ऍस्पायर टू इन्सपायर’ राष्ट्रीय परिषदेचा समारोप
पुणे : “सनदी लेखापाल (सीए) हा अर्थव्यवस्थेसाठी सल्लागार, रचनाकार, डॉक्टर, मार्गदर्शक, व्यवस्थापक असतो. तंत्रज्ञानाचा अंतर्भाव आणि बदलत्या करप्रणाली यामुळे सीए अद्ययावत असायला हवा. सीएचे काम पारदर्शक आणि जबाबदारीचे असावे. त्यासाठी सीए होणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या ‘आर्टिकलशीप’च्या काळात सचोटी, प्रामाणिकता आणि समर्पित भावनेने काम करावे,” असा सल्ला एशियन ओशियन स्टॅंडर्ड सेटर्स ग्रुपचे (एओएसएसजी) चेअरमन गुरुतुल्य सीए डॉ. एस. बी. झावरे यांनी विद्यार्थ्यांना दिला.
दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया (आयसीएआय) पुणे शाखा, स्टुडंट स्किल्स एनरीचमेन्ट बोर्ड (बोर्ड ऑफ स्टडीज), आयसीएआय पुणे ‘विकासा’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सीए विद्यार्थ्यांसाठीच्या तीन दिवसीय राष्ट्रीय परिषदेच्या समारोपावेळी झावरे बोलत होते. अभिनेते विक्रम गोखले, उद्योजक डॉ. संजय मालपाणी, ‘आयसीएआय’चे उपाध्यक्ष सीए निहार जांबूसारिया, केंद्रीय समितीचे सदस्य सीए चंद्रशेखर चितळे यांनी विविध सत्रांत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सीए नरेंद्र अगरवाल, सीए शोभना गाडो, सीए शशिकांत लोणीकर यांनी ज्युरी म्हणून काम पहिले.
यावेळी ज्येष्ठ सदस्य सीए जगदीश धोंगडे, सीए शशांक पत्की, पुणे ‘आयसीएआय’चे चेअरमन सीए अभिषेक धामणे, माजी अध्यक्षा सीए ऋता चितळे, उपाध्यक्ष आणि ‘विकासा’चे चेअरमन सीए समीर लड्डा, सचिव खजिनदार सीए काशिनाथ पाठारे, ‘विकासा’चे उपाध्यक्ष मन्मथ शेवाळकर आदी उपस्थित होते. यावेळी सीएच्या विविध परीक्षांत उल्लेखनीय यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना व सीएना सन्मानित करण्यात आले. अक्षत गोयल याला ‘बेस्ट पेपर प्रेझेंटेशन’चा पुरस्कार मिळाला. ‘डेटा प्रोटेक्शन बिल’ यावर त्याने सादरीकरण केले.
डॉ. एस. बी. झावरे म्हणाले, “सीए हे अर्थव्यवस्थेचे आधारस्तंभ आहेत. सीए होण्यासाठी कठोर परिश्रम, जिद्द, चिकाटी असायला हवी. आर्टिकलशीप ‘सीए’च्या प्रवासात अत्यंत महत्वाचा टप्पा आहे. प्रगल्भ सीए होण्यासाठी त्यात प्रामाणिकता, सातत्य असावे. व्यवसायाच्या सगळ्या बाजू समजून घेण्याची क्षमता विकसित करावी. क्षमता, कमतरता, संधी आणि आव्हाने या गोष्टींवर काम करावे. महिलांचा या क्षेत्रात वाढता सहभाग सकारात्मक बाब आहे. कोरोनामुळे आलेली आव्हाने पेलत सीएनी अर्थव्यवस्थेला उभारी देण्याचे काम करावे.”
विक्रम गोखले म्हणाले, “कोरोनामुळे अनेक क्षेत्रांवर अर्थसंकट ओढवले आहे. मनोरंजन क्षेत्रालाही मोठा फटका बसला आहे. लेखन, सिनेमा हे माझे जीवन असून, ते जगण्यासाठी मिळेल ते काम करण्याची तयारी ठेवली आहे. या मंदावलेल्या अर्थचक्राला गती देण्यात सनदी लेखापालांनी पुढाकार घ्यावा. या परिस्थितीतून सहीसलामत बाहेर पाडण्यासाठी सर्वानी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे.”
डॉ. संजय मालपाणी म्हणाले, “आपले भवताल असंख्य संधींचे भांडार आहे. आपल्यातील कौशल्ये, तज्ज्ञता यानुसार या संधींचा लाभ घेता आला पाहिजे. आजची पिढी तंत्रस्नेही आहे. मात्र, त्याला जीवनमूल्यांची आणि निर्णयक्षमतांची जोड देणे महत्वाचे आहे. प्रतिक्रियावादी बनण्यापेक्षा कृतिशील बनावे. आनंदी, तणावमुक्त जीवन जगतानाच सजग राहावे.”
सीए निहार जांबूसारिया, सीए चंद्रशेखर चितळे, सीए ऋता चितळे, सीए सचिन सस्ताकार, ऋषिकेश वांगडे, शिरीष देशपांडे आदींनी मार्गदर्शन केले. सीए समीर लड्डा यांनी स्वागत प्रास्ताविक केले. मन्मथ शेवाळकर याने आभार मानले.

