जुन्नर – ( संजोक काळदंते)
महाशिवरात्री निमित्त पुणे,अहमदनगर आणि ठाणे जिल्ह्याच्या सरहद्दीवर असणाऱ्या उदार राजा हरिश्चंद्र गडावर असणाऱ्या पौराणिक हेमांडपंथी शिवमंदिरातील पिंडीचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून नव्हे तर ईतर राज्यातून देखील परप्रांतीय भाविक भक्त आले होते.या ठिकाणी जाण्यासाठी खूप मोठ्या डोंगर कड्यातून पाऊल वाट आहे चार डोंगर चढण उतरण करून मग मंदिर येते प्रती वर्षी ठीकठिकाणाहून भाविक मोठ्या भक्ती भावाने मोठ्या प्रमाणावर येत असतात.येथे जाण्यासाठी ठाणे,अहमदनगर आणि पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील माळशेजघाट माथ्य जवळून खिरेश्वर येथून पाऊल वाट आहे.इथून पुढे गेल्यावर तोलारखिंड हा अवघड चढण रस्त्याचा मार्ग आहे या मार्गाने मुंबई आणि पुणे जिल्ह्यातील तसेच नजीकची भाविकभक्त मंडळी दर्शनासाठी येत असतात.निसर्गाचा अप्रतिम अविष्कार आणि दैविक सत्व असल्याची दृढ भावना येथे भाविकांना खेचल्याशिवाय राहत नाही असे येथे येणारे भाविक सांगतात.
महाशिवरात्री निमित्त खिरेश्वर या गावात पुरातन नागेश्वर मंदिराजवळ ग्रामस्थांतर्फे आठ दिवस अखंड हरिनाम सप्ताहचे अयोजन करण्यात येते चालू वर्षी देखील महाशिवरात्री निमित्त सप्ताह दरम्यान कीर्तने,भारुड आणि जंगी कुस्त्याच्या आखाड्याचे अयोजन करण्यात आले होते.याठिकाणी मोठी यात्रा भरली होती.गडावर येणाऱ्या भाविकांकरिता श्री.स्वामी समर्थ भक्त मंडळ-ओतूर,कृपासिंधु स्वामी समर्थ प्रतिष्ठान-आळेफाटा,श्रीराम सेवा मंडळ जुन्नर यांच्या वतीने भाविकांना सरबत,मोफत खिचडी,केळी,फराळ,ताक,लस्सी वाटप करण्यात आले.दूरदूरवरून आलेल्या भाविकांच्या आरोग्य सेवेकरिता प्राथमिक आरोग्य केंद्र मढ(ता.जुन्नर)चे उपकेंद्र खिरेश्वर यांच्या वतीने मोफत आरोग्य सेवा देण्यात आली.दोन दिवसात गडावर जाणाऱ्या येणाऱ्या सुमारे शंभर भाविकांना आरोग्य सेवा देण्यात आली.मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविक भक्तांचा महासागर असल्याने येथे कोणताही अनुचित प्रकार होवू नये म्हणून ओतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र थोरात यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. राजा हरिश्चंद्र गडावर येणाऱ्या भाविक भक्तांमध्ये दिवसेंदिवस वाढच होत असल्याने येथे महामार्गापासून येणे जाने साठी चांगला रस्ता असावा आणि तोलारखिंड फोडून अहमदनगर आणि पुणे जिल्ह्याला जोडणारा मार्ग लवकरात लवकर व्हावा अशी आग्रही मागणी भाविक करीत आहेत.याची दखल आदिवासी नेत्यांनी घेतल्यास या परिसरातील आदिवासी दुर्गम भागाचा काया पालट होणार आहे.तसेच या गडावरील शिव मंदिर आता जीर्ण होवून अनेक शिळा फुटल्या आहेत पुरातत्व विभागाने या कडे लक्ष घालून लवकरात लवकर मंदिराचा जीर्णोद्धार करावा अशी आग्रही मागणी येथे येणाऱ्या शिवभक्तांनी केली आहे.
खिरेश्वर ग्रामस्थांनी गडाच्या पायथ्याशी असणारे पुरातन श्री नागेश्वर मंदिर जवळ मोठी यात्रा भरवली होती या यात्रेनिमित्त मंगळवार दि. १ मार्च ते ८ मार्च अखंड हरिनाम सप्ताहचे आयोजन करण्यात आळे होते.तसेच यात्रेनिमित्त जंगी कुस्त्यांचा आखाडा भरला होता याचा यात्रेत आलेल्या भाविकांसह कुस्ती शौकिनांनी मनमुराद आनंद घेतला.
तसेच नगर-कल्याण महामार्गावर पांगरी तर्फे मढ येथे श्री.लिंगेश्वर हे स्वयंभू शिवलिंग असणारे मंदिर आहे येथे देखील हरिनाम सप्ताहचे आयोजन करण्यात आले होते दर्शनाकरिता भाविकांनी येथेही गर्दी केली होती.