मला आमदार व्हायचंय: आशाताई बुचके
जुन्नर शहरात बुचके यांच्या सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद
जुन्नर, दि. ४ (आनंद कांबळे वार्ताहर) –
गोरगरीबांची, पिडितांची आणि सामान्य नागरिकांची सेवा करण्यासाठी विधानसभेत पाठविण्याचे भावनिक आवाहन जुन्नर विधानसभेच्या अपक्ष उमेदवार आशाताई बुचके यांनी केले.
शुक्रवारी (दि. ४) जुन्नर शहरातून काढण्यात आलेल्या रॅलीनंतर मार्केट यार्डच्या आवारात आयोजित प्रचारसभेत बुचके बोलत होत्या. जुन्नर शहरात आयोजित या प्रचार सभेतील गर्दी पाहता “मला आज एबी फॉर्म मिळाला” असे उद्गार याप्रसंगी बुचके यांनी काढले.
कोणताही पक्ष किंवा ज्येष्ठ नेता उपस्थित नसतानाही बुचके यांच्या सभेला याप्रसंगी हजारो सामान्य नागरिकांनी हजेरी लावली होती. गेली २५ वर्षे मी तालुक्यात जनतेची कामे प्रामाणिकपणे केली असून यंदा आपण मला विधान सभेत पाठविणार याबद्दल आता मला शंका नाही, असे बुचके यांनी याप्रसंगी सांगितले. मागील विधानसभेला पक्षाचा एबी फॉर्म स्वतः बाळासाहेब ठाकरे यांनी मला दिला होता, परंतु नंतर राजकारण केले गेले. दोन वेळा पक्षाने संधी मिळाली मात्र तालुक्यातील नेत्यांनीच घात केल्याचा आरोप बुचके यांनी याप्रसंगी केला.
मी आपणास माझी झोळी पसरून मतांची भीक मागत आहे, माझ्यावर प्रेम करणाऱ्यांकडे मतांची भीक मागताना मला आनंदच वाटत असून तो माझा हक्कच आहे, असे कळकळीचे आवाहन त्यांनी केले. तालुक्यातील शेतकर्यांसाठीचे पाण्याचे नियोजन फसले आहे, तालुक्यात पाच धरणे असूनही वर्षोनुवर्षे आदिवासी भागात टँकर सुरू आहेत. ही संधी पुन्हा येणार नाही, त्यामुळे माझ्यासाठी तुम्हाला लढायचं आहे, मला नेता नसून तुम्हीच माझे नेते आहात, कामाला लागा, असे बुचके यांनी आपल्या भाषणात सांगितले.
माझी शिवसेनेतून हकालपट्टी झाली असून आता आपले चिन्ह धनुष्यबाण नाही, मात्र माझे दैवत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आहेत, तो हक्क माझ्याकडून कोणीही हिरावून घेऊ शकत नसल्याचे बुचके यांनी सांगितले. याप्रसंगी नारायणगावचे सरपंच बाबू पाटे, विघ्नहरचे संचालक संतोषनाना खैरे, प्रसन्ना डोके, पंडित मेमाणे, संगीता वाघ, राजेंद्र चव्हाण, बंडूशेठ बांगर, ज्योती दुराफे आदींची भाषणे झाली. सूत्रसंचालन आशिष माळवदकर यांनी केले.