जुन्नर /आनंद कांबळे
स्वच्छ भारत अभियान (नागरी) अंतर्गत पश्चिम विभागात केंद्र शासनाने राबविलेल्या स्वच्छ सर्वेक्षण 2018 व 2019 मध्ये उल्लेखनीय आणि उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल जुन्नर नगर परिषदेला महारष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि राज्याच्या नगर विकास विभागाच्या प्रधान सचिवमनिषा म्हैसवर यांच्या हस्ते प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.
या वेळी नगराध्यक्ष शाम पांडे, मुख्याधिकारी डॉ. जयश्री काटकर-बोराडे , नगरसेवक समिर भगत,दिपेश परदेशी,( गटनेता शिवसेना, )आरोग्य प्रमुख. प्रशांत खत्री यांनी हा सन्मान स्विकारला.
जुन्नर नगरपरिषदेने केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण 2018 व 2019 मध्ये विविध उपक्रम राबविले. त्याची पाहणी केंद्र शासनाच्या थर्ड पार्टी मार्फत जानेवारी 2018 मध्ये करण्यात आली होती. स्पर्धेत देशातील अनेक शहरांचा सहभाग होता.
या स्पर्धेत संपूर्ण भारतामधून 4,237 शहरे व महारष्ट्रातून 391 शहरे सहभागी झाली होती. लोकसंख्येनुसार 25,000 ते 50,000 लोकसंख्या असलेल्या शहरांमधून जुन्नर शहराने देशात 15 वा क्रमांक मिळवला. घनकचरा व्यवस्थापन अधिनियम -2016 अन्वये जुन्नर शहरामध्ये 100% घरोघरचा कचरा संकलन, कचराकुंडीमुक्त शहर, घनकच-याचे विलगीकरण, शहर स्वच्छता व साफसफाई, सफाई कर्मचा-यांना वैद्यकीय तपासणी, विमा इ. सुविधा व प्रशिक्षण, पथनाट्य, भाषणे व स्वच्छता स्पर्धा यांचे आयोजन मानांकन प्रमाणपत्र व ODF + प्रमाणपत्र प्राप्त केले. तसेच जुन्नर शहरातील नागरिकांनी दिलेल्या प्रतिक्रियांमुळे जुन्नर नगर परिषदेने स्वच्छ सर्वेक्षण 2019 मध्ये यश प्राप्त केले.
विविध उपक्रम राबवित असताना प्रत्येक व्यक्तीने हे शहर आपले आहे ते स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी आपलीच आहे, असे मानून प्रशासनाला सहकार्य केले पाहिजे, अशी भावना नगराध्यक्ष शाम पांडे यांनी व्यक्त केली. तसेच मुख्याधिकारी डॉ. जयश्री काटकर- बोराडे यांनी प्रशासनाला अशीच साथ देण्याचे आवाहन केले.