पुणे – वाहतुकीची कोंडी सोडविण्याच्या नावाखाली पोलिसांनी आपल्या अधिकारात ,पोलीस बंदोबस्तात जुना बाजार कोणतीही नोटीस न देता अचानक बंद केल्यानंतर आज शेकडो दुकानदारांची दुकाने बंद झाली अचानक पोटावर पाय पडलेल्या या दुकानदारांनी येथे गर्दी केली यावेळी येथे दुकानदारांची सहानुभूती मिळवायला गेलेले माजी राज्यमंत्री आमदार दिलीप कांबळे यांनी मोठे दुटप्पी वाटेल असे भाषण करून …जावू द्यात आज बंद केलाय बाजार ना .. आज आखाड पार्टी करा .. रविवारी मात्र दुकाने आपण सुरु करू ,माझा भाऊ महापालिकेत स्थायी समितीचा अध्यक्ष आहे पैशाची चिंता करू नका अशी विधाने केली ,तर तत्पूर्वी शहरात वाहतुकीचा प्रश्न गंभीर झालाय गाड्या फार वाढल्यात असे हि सांगून पोलीस आपल्याबरोबरच आहेत असे अजब विधान हि केले
पुणे शहरात अनेक वर्षांपासून बुधवार आणि रविवार या दोन दिवशी मंगळवार पेठेतल्या शाहीर अमर शेख चौक ते कुंभार वेस पर्यंत जुना बाजार भरवला जातो. रस्त्याची एक बाजू बंद करुन भरवण्यात येणाऱ्या या बाजारामुळे मोठी वाहतूक कोंडी होत असते. यावर तोडगा काढण्यासाठी प्रशासनाने थेट बाजारच बंद ठेवण्याचे आदेश काढले आहेत. मात्र, याला विक्रेत्यांनी विरोध केला असून त्यांनी बाजाराच्या ठिकाणी ठिय्या आंदोलन केले. यावेळी त्यांची समजूत घालण्यासाठी आंदोलनस्थळी दाखल झालेल्या आमदार दिलीप कांबळे यांनी पुढच्या रविवारी बाजार भरवण्याची व्यवस्था केल्याचे सांगत आज बाजार बंद ठेवावा लागल्याने सर्वांनी आखाड साजरा करावा, असा सल्ला आंदोलकांना दिला.
जुना बाजाराच्या दिवशी होणाऱ्या वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका व्हावी. या दृष्टीने महिनाभर प्रायोगीक तत्वावर जुना बाजार बंद ठेवण्याचे आदेश पोलीस सहआयुक्त राजेंद्र शिसवे यांनी काल (मंगळवारी) काढले. या आदेशानुसार आज (बुधवार) जुना बाजार भरवण्यास मनाई करण्यात आल्याने जुना बाजारातील विक्रेत्यांनी सकाळी नऊ वाजल्यापासून रस्त्यावर ठिय्या मांडला. यावेळी पुणे महापालिका अतिक्रमण अधिकारी माधव जगताप, नगरसेवक योगेश समेळ, जुना बाजार संघटनेचे सल्लागार विलास वाडेकर आणि पोलीस कर्मचारी हे उपस्थित होते. आंदोलन सुरु झाल्याची बातमी कळताच माजी राज्यमंत्री आणि विद्यमान आमदार दिलीप कांबळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन सर्व विक्रेत्यांशी तासाभर चर्चा केली.
यावेळी कांबळे म्हणाले, पुणे शहरातल्या अनेक भागातील आणि जिल्ह्यातील नागरिक जुन्या बाजारात खरेदीसाठी येत असतात. या ठिकाणी विक्रेत्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याने दुकाने रस्त्यावर लावली जातात. त्यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. हे लक्षात घेऊनच पोलीस आणि महापालिका प्रशासनाने जुना बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, येत्या रविवारी बाजार भरवला जाईल तसेच अनेक वर्षांपासूनचा बाजारासाठीच्या इमारतीच्या मागणीचा पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

