पुणे : “शालेय-महाविद्यालयीन स्तरावर होणाऱ्या स्पर्धांमधून आपल्यातील कलाकार बहरत जातो. या स्पर्धांतूनच माझ्यातील ‘कलाकार’ घडला. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्यातील कलागुण विकसित करण्यासाठी या व्यासपीठाचा उपयोग करून घेतला पाहिजे. रियाज, सराव या गोष्टींना जास्तीत जास्त वेळ देऊन आणि आपल्यातील क्षमता ओळखून मेहनत केली, तर शास्त्रीय संगीत क्षेत्रात यशस्वी होऊ शकता,” असे कानमंत्र अभिनेत्री व नृत्यांगना नुपूर दैठणकर यांनी विद्यार्थ्यांना दिला.
डॉ. विश्वनाथ कराड एमआयटी विश्वशांती विद्यापीठाच्या फॅकल्टी ऑफ मॅनेजमेंटतर्फे (अंडरग्रॅज्यु एट) संगीतभारती व नृत्यभारती या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन व नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. एमआयटी कोथरूडच्या प्रांगणात झालेल्या या स्पर्धेच्या पारितोषिक वितरणप्रसंगी त्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत होत्या. याप्रसंगी एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. आर. एम. चिटणीस, प्रसन्न हॉलीडेजचे मझहर शेख, सचिन राजोपाध्ये, भक्ती सुर्वे, स्पर्धेच्या संयोजिका कल्याणी बेलसरे, ललित आफळे, प्रा. दीक्षा बेडेकर, प्रा. शलाका घोडके आदी उपस्थित होते.
राज्यभरातुन संगीतभारती स्पर्धेत ३४, तर नृत्यभारती स्पर्धेत एकूण ३७ स्पर्धकांनी यात सहभाग घेतला. शास्त्रीय गटात सौरभ पांढरे याने प्रथम, शीतल गद्रे हिने द्वितीय, तर मीता दांडेकर हिने तृतीय क्रमांक पटकावला. उपशास्त्रीय गटात शीतल गद्रे हिने प्रथम, मीता दांडेकर हिने द्वितीय तर श्रिया शिंदे हिने तृतीय क्रमांक पटकाविला. नृत्यभारती स्पर्धेत गौरी बराटे हिने प्रथम, श्रेया शिंदे हिने द्वितीय, तर इशा कुलकर्णी हिने तृतीय क्रमांक पटकावला. अनुक्रमे पाच हजार, तीन हजार व दीड हजार रोख पारितोषिक सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र असे बक्षिसाचे स्वरूप होते.
मझहर शेख यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. डॉ. आर. एम. चिटणीस यांनी प्रास्ताविकात संगीतभारती, नृत्यभारती या स्पर्धांच्या आयोजनामागील भूमिका विशद केली. प्रा. कल्याणी बेलसरे यांनी आभार मानले.

