पुणे : “पुण्याच्या मातीत सूर भरलेले आहेत. इथला प्रत्येकजण संगीतप्रेमी असून, कलाकारांना दाद देण्याची वृत्ती पुणेकरांमध्ये आहे. या मातीतल्या संगीतप्रेमींनी दिलेल्या दादेमुळे माझे वादन आणखीच बहरत गेलेले आहे. त्यामुळे माझा पुढील जन्म या स्वरमयी पुण्याच्या मातीत व्हावा,” अशी भावना आंतरराष्ट्रीय ख्यातीचे बासरीवादक पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरसिया यांनी व्यक्त केली. शिष्याकडून झालेल्या या अनोख्या स्वरवंदनेने खुद्द चौरसियाही भारावून गेले.
पंडित हरिप्रसाद चौरसिया यांना त्यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त त्यांचे शिष्य सौरभ वर्तक यांच्या ‘सौरभ फ्लूट अकॅडमी’तर्फे सामूहिक बासरीवादनातून मानवंदना देण्यात आली. चौरसिया यांचे ८१ दिव्यांनी औक्षण करून पाद्यपूजन व पुष्पवृष्टी करण्यात आले. तसेच तालयोगी पंडित सुरेश तळवलकर यांच्या हस्ते हरिप्रसाद चौरसिया यांचा विशेष सत्कार करण्यात आला. शनिवार पेठेतील ओंकारेश्वर मंदिराजवळील विष्णुकृपा हॉलमध्ये हा हृद्य सोहळा पार पडला. यावेळी सौ. अनुराधा चौरसिया, पंडित अतुलकुमार उपाध्ये, संयोजक सौरभ वर्तक, चित्कला मुळे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
सौरभ फ्ल्यूट अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी तीन गटांत सामूहिक बासरीवादन केले. बासरीतून निघालेल्या अवीट स्वरांनी रसिक मंत्रमुग्ध झाले. तर सौरभ वर्तक यांनी एकल बासरीवादन करत पंडितजींना अभिवादन केले. या बासरीवादनात भूप, दुर्गा आणि यमन राग सादर झाले. यमन रागातील रूपक ताल आणि पहाडी वादन यामुळे कार्यक्रमात रंगत आली. त्यांना तबल्यावर निलेश रणदिवे आणि पखवाजावर ओंकार दळवी यांनी साथ केली.
पंडित सुरेश तळवलकर म्हणाले, “काही व्यक्ती या सिद्धहस्त असतात. त्यातीलच पंडित चौरसिया आहेत. ते एक प्रेरणादायी गुरु आहेत. संगीतात गुरुभक्तीला अपार महत्व असून, सौरभ वर्तक यांनी ही गुरुभक्ती परंपरा जोपासली आहे. नवीन शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनीही ही गुरुभक्तीची परंपरा जोपासावी.” चित्कला मुळ्ये यांनी सूत्रसंचालन केले. आदिती मूळये यांनी आभार मानले.





