विजयकुमार जैन यांचे मत; राष्ट्रभाषेच्या सन्मानासाठी ‘भारतीय भाषा सन्मान यात्रा’
पुणे : महात्मा गांधी म्हणत ज्या देशाला राष्ट्रभाषा नाही, तो देश मुका असतो. भारत विविधतेने नटलेला देश आहे. या देशात अनेक भाषा बोलल्या जातात. देशाचा राष्ट्रीय प्राणी, पक्षी आणि मुद्राही आहे. मग आपल्या देशाला राष्ट्रभाषा का असू नये? त्यामुळे भारताची संविधानिक राष्ट्रभाषा जाहीर व्हावी, हिंदीला राष्ट्रभाषेचा, तसेच प्रांतीय भाषांना राज्यभाषेचा दर्जा द्यावा आणि भारताला इंडिया नव्हे, तर भारत म्हणूनच संबोधावे,” अशी मागणी अभियानाचे प्रमुख ज्येष्ठ पत्रकार व संपादक विजयकुमार जैन यांनी केली.
राष्ट्रभाषेच्या सन्मानासाठी भारतीय भाषा अपनाओ अभियान अंतर्गत वरिष्ठ पत्रकार व संपादक बिजयकुमार जैन यांच्या पुढाकारातून मुंबई येथून ही भाषा सन्मान यात्रा मंगळवारी सकाळी ६.०० वाजता निघाली. २५ डिसेंबर २०१८ ते ४ जानेवारी २०१९ या कालावधीत ‘भारतीय भाषा सन्मान यात्रा’ काढण्यात आली आहे. भारतीय भाषा अपनाओ अभियानांतर्गत ५०० भारतीयांचे शिष्टमंडळ देशभर फिरुन राष्ट्रभाषेसाठी जागृती करणार आहे. हे शिष्टमंडळ मंगळवारी पुण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी पुण्यातील नागरिक आणि पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी राष्ट्रीय भाषा समितीचे एम. एल. गुप्ता, अभियानाचे मुख्य संयोजक व ‘जीतो’चे माजी अध्यक्ष विजय भंडारी, महावीर प्रतिष्ठानचे विजयकांत कोठारी, अभियानाचे समन्वयक डॉ. कल्याण गंगवाल, रमेश ओसवाल, ‘जितो’चे अध्यक्ष कांतिलाल ओसवाल, पूना मर्चेंट चेंबरचे पोपटलाल ओस्तवाल, अरुण सिंघवी व अभय सेठिया, जितो व महावीर प्रतिष्ठानचे विश्वस्त यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. ‘पहले मातृभाषा फिर राष्ट्रभाषा’ हा संदेश घेऊन या यात्रा मुंबई-पुणे-सातारामार्गे कर्नाटकातील निपाणी, बेळगाव, मंगळूर, कुमटा, केरळातील कन्नूर, कोझिकोड, तामिळनाडूतील कोईमतूर, सेलम, चेन्नई, आंध्रप्रदेशातील नेल्लोर, विजयवाडा, तेलंगणातील हैदराबाद, अदिलाबाद, महाराष्ट्रातील नागपूर, मध्यप्रदेशातील ग्वाल्हेर, नरसिंहपूर, उत्तप्रदेशातील ललितपूर, आग्रामार्गे दिल्लीत जाणार आहे.
एम. एल. गुप्ता म्हणाले, “दोन पिढ्यानंतरची पिढी मातृभाषेत नीट बोलू शकत नाही. अनेक भाषा लुप्त होत आहेत. भाषा संपल्या तर देश संपतो. त्यामुळे आपली संस्कृती आणि भाषा यांचे संवर्धन होणे आवश्यक आहे. इंग्रजीचे भूत आपल्या मानगुटीवर बसलेले आहे. त्यामुळे आपल्या मातृभाषेला आणि स्थानीय भाषांना प्राधान्य द्यायला हवे.”
विजय भंडारी म्हणाले, “भाषा संवर्धनाची मागणी अतिशय रास्त असून, आपण सर्व देशवासीयांनी त्याला पाठिंबा द्यायला हवा. ‘जितो’ हे व्यासपीठ फक्त जैन समाजापुरते मर्यादित नाही. तर इतर समाजाच्या विकासासाठीही कार्यरत आहे. हा विषय ‘जितो’च्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न आहे.”
डॉ. कल्याण गंगवाल म्हणाले, “हिंदी दिवसाच्या पार्श्वभूमीवर ४ जानेवारी २०१९ रोजी हे शिष्टमंडळ राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांना निवेदन देणार आहे. भारतीय भाषांचा सन्मान वाढवावा, भारताची राष्ट्रभाषा असावी व भारताला इंडिया नव्हे, तर भारत संबोधावे, या मागण्यांचा समावेश आहे.”
१०१ गाड्यांच्या ताफ्यातून ५०० हिंदी सेवक दिल्लीत दाखल होणार आहेत. भारतीय भाषांच्या संवर्धनासाठी हे अभियान अतिशय महत्वाचे असून, त्यामध्ये आपण सर्व भारतीयांनी सहभागी व्हावे, असे आवाहन अभियानाचे राष्ट्रीय समन्वयक रमेश ओसवाल यांनी केले.

